तासगाव, ता.20(प्रतिनिधी) शेतीला जोडधंदा असणाऱ्या पशुपालना बाबत शेतकरी वर्गात कमालीची उदासीनता आहे. पशुखाद्याचे वाढते दर, औषध उपचार आणि कमी दूध उत्त्पादन यामुळे पशुपालन न परवडणारे आहे. दुधाचे उत्पादन कमी देणाऱ्या देशी गाय तर दुर्मिळच बनली आहे. असे चित्र असतानाही कवठे एकंद ता. तासगाव येथील जाधव कुटुंबीयांनी देशी गाईचे संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने जनावरांचे संगोपन केले आहे.
नफ्या तोट्याचा विचार न करता देशी गायीचे संगोपन घरातील सदस्याप्रमाणे करून जाधव कुटुंबीयांनी जनावरांशी लळा निर्माण केला आहे. नुकत्याच त्यांच्या लाडक्या " गंगा" या देशी गाईचे डोहाळे जेवण कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.भरजरी झुल, हार फुलांनी सजवून, पंचपक्वानांचा नैवेद्य ,गोडधोड जेवण अशा दिमाखात एखाद्या महिलेप्रमाणे या गायीचे डोहाळे जेवण कार्यक्रम झाला. सुहासिनी महिलांच्या हस्ते ओटी भरण झाले.मित्रमंडळी, पै -पाहुण्यांच्या गोड धोड जेवणाच्या पंगती पार पडल्या.हौसेला मोल नसते. हया उक्तीतून जाधव कुटुंबीयांनी पशु प्रेमाचा सामाजिक संदेश दाखवून दिला.
बैलप्रेमी असणाऱ्या बजरंग जाधव यांनी शेतातील बैला कडून होणारी कामे कमी झाली. असली तरी जनावरांशी फारकत न करता देशी गाई संगोपनाचे ध्येय उराशी बाळगले आहे.
दहावीपर्यंतचे जेमतेम शिक्षण असणारे बजरंग पांडुरंग जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेतीतील मशागतीसाठी बैलांची जोपासना पिढी जात पणे केली आहे. मूक जनावराशी लळा असल्याकारणाने सध्या 18 गाई,2 म्हशी असा तब्बल वीस जनावरांचा गोठा जाधव कुटुंबीयांनी सांभाळला आहे. घरातील महिलांच्या सह सचिन जाधव,आकाश जाधव, युवराज जाधव,सुरज जाधव, पंकज जाधव,रणवीर जाधव यांचे संगोपनासाठी सहकार्य मिळते. तर बंधू प्रकाश जाधव,संजय जाधव,सुनील जाधव यांचेकडून प्रोत्साहन मिळते असे बजरंग जाधव यांनी सांगितले.
बदलत्या शैलीमुळे माणसातली माणुसकी अलीकडे कमी होत चालली असल्याचे अनेक उदाहरणे अनुभवायला येतात. अशा परिस्थितीला छेद देत जाधव कुटुंबीयांनी जनावरांशी लावलेला लळा हा कौतुकास्पद आहे.
नाविन्य आणि आधुनिकता यामुळे माणसाच्या राहणीमानात प्रचंड बदल झाला आहे. जुन्या परंपरा,रिती- रिवाज सोडून माणूस नव्या स्वप्नांच्या दुनियेत वावरताना दिसत आहे. सण,समारंभ राहणीमान यामध्येही बदल झाले आहेत. स्वयंपाक घरातील चुलीपासून शेतीमध्ये अनेक बदल झाले आहेत. एकीकडे आधुनिकता सोयीची ठरत आहे तर पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण समाजासाठी घातक बनत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीतून जाधव कुटुंबीयांनी जपलेली मूक जनावरावरील आपुलकी समाजासाठी आदर्शवत आहे.
कवठे एकंद जाधव कुटुंबाकडून लाडक्या ” गंगा” देशी गाईचे डोहाळे जेवणानिमित्ताने पूजा अर्चा व सजावट केली होती