तासगाव, ता.२(प्रतिनिधी)
शिक्षणमहर्षी डॉ.बापुजींनी सांगितलेली ज्ञान , विज्ञान आणि सुसंस्कार” ही जीवनाची त्रिसूत्री विद्यार्थीनीनी जीवनात आत्मसात करावी असे प्रतिपादन डॉ.शैलजा साळुंखे यांनी केले. येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात पदोन्नती आणि काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरच्या एक आधार स्तंभ आणि श्रीमती आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या म्हणून त्यांनी काम केले आहे. महाविद्यालयातील प्रा. प्रमिला सुर्वे यांना पदोन्नती पदी म्हणून कॅप्टन ही पदवी मिळाली म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. तर प्रा.प्रतिभा पैलवान यांच्या ‘तुझी माझी मैत्रवेल’ या दीर्घ कविता संग्रहाच्या प्रकाशनाचा सोहळा महाविद्यालयात पार पडला.
या महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या म्हणून त्यांनी इथल्या खूप आठवणी सांगितल्या. सर्व विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवा, येणारा काळ खूप कठीण आहे. त्यामध्ये टिकून राहायचं असेल तर स्वतःला सिध्द करावेच लागेल , असा मोलाचा सल्ला दिला. क्षणिक मोहाच्या मागे न लागता आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. समाजासाठी काही तरी चांगल काम करण्यासाठी स्वतःला सक्षम बनवा, असे त्या म्हणाल्या. यावेळी तेजश्री प्रकाशन आणि पद्मरत्न प्रकाशनचे श्री दादासाहेब जगदाळे उपस्थित होते.
प्राचार्या त्रिशला कदम यांनी सर्व प्राध्यापक बंधू – भगिनी आणि विद्यार्थिनींच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी सतत प्रयत्न केला जाईल असे मत व्यक्त केले. विविध गुणवंत प्रधापाकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संगीता पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन डॉ.संपदा टीपकुर्ले आणि प्रा.सोनाली बोरगांवकर यांनी केले,प्रा.सुधाकर ईंडी यांनी आभार मानले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.