वायफळेच्या पोलीस पाटीलपदी मेहबूब मुलाणी कायम

निलंबन रद्द : ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणात न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

तासगाव, दि.१५ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील वायफळे येथील पोलीस पाटील पदावर कार्यरत असणाऱ्या मेहबूब जमाल मुलाणी यांच्यावर 2015 मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्यांना निलंबित करण्याचे आदेश तत्कालीन प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिले होते. दरम्यान या गुन्ह्यात न्यायालयाने मुलाणी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे त्यांना पोलीस पाटील पदावर कायम ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिले आहेत. याबाबत माहिती अशी, वायफळेच्या पोलीस पाटीलपदी मेहबूब मुलाणी हे कार्यरत होते. तत्पूर्वी ते ग्रामपंचायतीत लिपिक म्हणून काम करीत होते. ग्रामपंचायतीत लिपिक म्हणून काम करताना मुलाणी यांनी घरपट्टी, पाणीपट्टीच्या बोगस पावत्या तयार करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्यांना अटकही झाली होती. मुलाणी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश तत्कालीन प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिले होते. मुलाणी यांच्या निलंबनामुळे गेल्या सात वर्षांपासून पोलीस पाटील पद रिक्त होते. याकाळात यमगरवाडी, बिरणवाडी येथील पोलीस पाटलांकडे वायफळेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. दरम्यान, गेल्या सात वर्षांपासून मुलाणी यांच्याविरोधातील गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात सुरू होती. नुकतेच न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले आहे. त्यानंतर मुलाणी यांनी न्यायालयाचा आदेश जोडून आपणास पुन्हा पोलीस पाटील पदावर हजर करावे, अशी मागणी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे केली होती. त्यानुसार शिंगटे यांनी मुलाणी यांना पुन्हा कामावर घेत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.