शिराळा, दि.17(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) जंगली प्राण्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी वन विभागाने अद्याप ठोस पावले उचलली नसल्याने गुढीपाडव्यानंतर शिराळा तालुक्यातील शेतकरी शासनाच्या विरोधात आर या पारचे आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी दिली. आरळा ता. शिराळा येथे झालेल्या शिराळा पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना रणधीर नाईक म्हणाले, वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव पाहता, गेली अनेक दिवस जिल्हाधिकारी कार्यालय, वनविभाग कार्यालय, तहसील कार्यालय याठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. निवेदन दिली गेली आहेत. यावर फक्त चर्चा झाल्या मात्र याकामी शासकीय स्तरावरून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. याबाबत उपाययोजना करणे संदर्भात कोणतीही बाब प्रस्तावित करण्यात आलेले नाही. बिबट्या, गवे, रानडुक्कर, माकड, मोर, लांडोर, भटकी कुत्री यांच्याकडून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बिबट्या आणि गव्यांच्या दहशतीने शेतकरी शेतात जायला घाबरत आहे. त्याचबरोबर शेळीपालन, कोंबडी पालन करून आपला संसार चालविणारे गोरगरिब अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागात शेतीसाठी रात्रीची लाईट असते त्यामुळे शेतकरी पाणी पाजायला आपला जीव मुठीत घेऊन जात आहे. नुकसानीचे पंचनामे वेळेत होत नाहीत. याकामात अधिकाऱ्यांच्या कडून वेळ काढूपणा केला जात असून शेतकऱ्यांना दुरुत्तरे दिली जातात. कमी दिवसांच्या पिकांची नुकसान भरपाई मिळत नाही. परिणामी काही शेतकऱ्यांनी शेती करण्याचे सोडून दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील तीस ते पस्तीस टक्के कुटुंबांचं स्थलांतर झालेल आहे. पुण्या – मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी शोधून सर्वसामान्य मंडळी आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. हि परिस्थिती अशीच राहिली तर नजीकच्या काळात तालुका विस्थापित व्हायला वेळ लागणार नाही. वन्यप्राणी अभयारण्याच्या बाहेर येत आहेत. त्यास अटकाव व्हावा याकरिता चांदोली अभयारण्यलगत संरक्षक कुंपण व्हावे यासाठी आंदोलन करून तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे याबाबत प्रस्ताव दिला होता. तरी देखील वन विभागाकडून अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. याबाबत ठोस पावले उचलली गेली नाही तर इथली शेती आणि शेतकरी उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून तालुक्यातील सर्वांना एकत्रितपणे सोबत घेऊन याबाबत गावोगावी जागृती करणार आहे. गुढीपाडव्यानंतर शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांची आर या पारची लढाई सुरू होईल. इथला शेतकरी वन्य प्राण्यांच्या त्रासाला वैतागलेला आणि चिडलेला असल्यामुळे या आंदोलनाचे स्वरूप उग्र असणार आहे हे निश्चित असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी माजी उपसभापती नथुराम लोहार, सरपंच प्रकाश धामणकर, माजी सरपंच वसंत पाटील, सावळा पाटील, संचालक प्रकाश जाधव, के वाय भाष्टे, बाबुराव डोईफोडे, माजी सरपंच आनंदराव पाटील, सरपंच विश्वास मस्कर, राकेश सुतार, दिलीप माजी सरपंच विजय पाटील, बाबा बेर्डे, माजी सरपंच लक्ष्मन पाटील, दिलीप सूर्यवंशी, संचालक सुधीर बाबर, जे के पाटील, कोंडीबा पाटील, रणजित येसले या मान्यवरांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
