१५ वर्षे अव्याहपणे राबतोय एकटाच अनोखा प्राणीमित्र, उघड्यावरती संसार – मुके प्राणीच त्याचे अवघे विश्व
तासगाव, दि. ९ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) हिंदू धर्मात गोमातेला देवता मानले जाते. गाईच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते. प्रत्येक विधीसाठी गाईचे गोमुत्र आणि शेण वापरले जाते, गाईच्या दुधाला आणि तुपाला सुद्धा सर्वात जास्त मागणी असते. अशी बहुउपयोगी असणारी गोमाता जेव्हा भाकड होते तेव्हा त्याच गाईला नरक यातना सोसाव्या लागतात. भाकड गाई एकतर सोडून दिल्या जातात नाहीतर काहींना कत्तलखाना दाखवला जातो. कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या अशाच भाकड गाईंचे संगोपन करणारा अनोखा प्राणीमित्र विश्वनाथ गणपती पाटील उर्फ बंडू पाटील. तासगाव तालुक्यातील कुमठे गावात गेल्या १५ वर्षापासून अव्याहतपणे मुक्या प्राण्यांच्या सेवेत एकटाच नव्या उमेदीने राबणाऱ्या बंडू पाटील या प्राणी मित्राची कहाणी…… कुमठे येथील मतकूणकी रस्त्यावर लोहार मळ्यात त्यांनी स्वतःच्या अवघ्या ९ गुंठे जागेत गाईना साधारण शेड उभारून स्वतःचा संसार मात्र उघड्यावर मांडला आहे. पंधरा वर्षापासून मुक्या जनावरांना आपले कुटुंब आणि परिवार माणून मुकी जनावरे हेच आपले “विश्व” समजून भाकड गाईंचा हा तारणहार “नाथ” बनून एकटाच झिजत आहे. एसटी मध्ये वाहक म्हणून नोकरी असलेले बंडू पाटील यांनी २००६ साली स्वेच्छा निवृत्ती घेतली. पूर्वीपासूनच कुत्रा, मांजर, चिमणी, कावळा, म्हैस, गाई यासह इतर सर्वच मुक्या प्राण्यांचा लळा असलेल्या बंडू पाटील यांनी येथून पुढील संपूर्ण आयुष्य गोमातेच्या सेवेत व्यथित करण्याचा निर्धार केला. तेव्हा पासून ते आज पर्यंत मुक्या जनावरांच्या सेवेत ते उदास ना होता नव्या उमेदीने सकारात्मक विचाराने झिजत आहेत. स्वतःच्या मळ्यात अगदी सध्या पध्दतीने उभारलेले शेड आणि तिथेच अहोरात्र २४ तास त्याच्या सोबत ते राहत आहेत. आज घडीला त्यांच्या गोठ्यात ४० भाकड गाई व एक घोडा, कुत्रे – मांजर असा संसार आहे. मान ओवाळनाऱ्या, झुलणाऱ्या, दात खाणाऱ्या, भाकड, मरणाच्या दारात जाऊन ठेपलेल्या, कत्तलखान्यात पाठवलेल्या, आजारी, सोडून दिलेल्या अश्या गाई त्यांच्या गोठ्यात आहेत. कोणताही मोबदला नाही, कोणतेही उत्पन्न नसताना त्यांना फुकट पोसण्याचे पवित्र सेवेचे काम ते करीत आहेत. कोणी चारा देत तर कोणी खुराक देते पण येणारी मदत तुटपुंजी असतानाही हि न खचता ते प्रामाणिकपणे राबत आहेत. नामशेष होत चालेलेल्या या गोवंश वाचविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. खिलारी, देशी, गीर, हॉस्टेन व इतर प्रजातीच्या गाई त्याच्या गोठ्यात आहेत. पावसाळ्यात ओला मुबलक प्रमाणात असतो, हिवाळ्यात पण कमतरता भासत नाही मात्र उन्हाळ्यात चाऱ्याचा प्रचंड तुटवडा जाणवतो. गाईना पक्का निवारा नाही, चाऱ्यासाठी दावण नाही त्यामुळे जनावरांचे खूप हाल होत आहेत. समाजातील काही दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी हात पुढे केले आहेत. मनोज पाटील हे चारा उपलब्ध करून देतात, नंदू पवार यांनी पाण्यासाठी बोअर मारून दिली आहे. बोअर मधील मोटार, कडबा कुट्टी मशीन साठी इस्कॉन हरेकृष्ण भक्त यांनी मदत केली आहे. दीपक पाटील, प्रशांत पाटील, प्रदीप माने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे तर अनेकांनी चारा आणण्यासाठी ट्रेक्टर-ट्रोली याची मदत केली आहे. आता गरज आहे ती बंदिस्थ निवारा, चारा साठी दावण या साठी गोमाता प्रेमींनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


