शिराळा, दि.15 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) पणुब्रे वारुण ता. शिराळा येथील कवी वसंत पाटील यांना लक्षणीय काव्यनिर्मितीबद्दल प्रतिष्ठेचा पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि फौंडेशनचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली. १ मे महाराष्ट्र दिनी नेरळ (नवी मुंबई )येथे पद्मश्री नारायण सुर्वे यांचे घरी होणाऱ्या काव्यजागर संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांचे हस्ते व प्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे, अरुण म्हात्रे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रा. प्रदीप पाटील प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. पाटील हे गेले पंचवीसवर्षाहून अधिक काळ काव्यलेखन करत असून त्यांचा ‘कविता धरणाआधी आणि नंतरच्या’ हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. लवकरच त्यांचा नवा कविता संग्रह येत आहे. यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषदेचे ते विद्यमान अध्यक्ष असून गेली वीस वर्ष साहित्य सांस्कृतिक चळवळीत कार्यरत आहेत. दरम्यान अकरा डोंगरी साहित्य संमेलने यशस्वी केली आहेत. तसेच ते राज्य धरणग्रस्त संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांना नारायण सुर्वेंचे वारसदार कवी म्हणून ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
