श्रीनिवास रामानुजन हे एक सर्वश्रेष्ठ गणिती होते – प्राचार्य अभयकुमार साळुंखे

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात नवीन स्थलांतरीत गणितशास्त्र शाखेचे उद्घाटन

तासगाव, दि.27 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) श्रीनिवास रामानुजन यांसारखा रात्रंदिवस सूत्र आणि गणिती समीकरणात गढून जाणारा असा महान गणिती भारतात होऊन गेला याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान हवा श्रीनिवास रामानुजन हे एक सर्वश्रेष्ठ गणिती होते असे उद्गार स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे गणितशास्त्राच्या स्थलांतरित शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले ते पुढे म्हणाले रामानुजन म्हणजे स्वतःच्या संघर्षातून कष्टाने गणिती अवकाशात अढळपद प्राप्त करणारा ध्रुवतारा होते. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या गुणवत्तेने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचे रोवत असल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. यावेळी व्यवस्थापक मंडळ सदस्य अविनाश (काका) पाटील विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत चमकण्यासाठी प्रोत्साहित केले. या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली व त्याचे विद्यार्थ्यांना शिल्ड रोख, पारितोषिक, प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. त्यासाठी प्रा.स्वप्नाली पाटील यांनी काम पाहिले. प्रास्ताविक व स्वागत गणितशास्त्र विभागप्रमुख प्रा.प्रभाकर पाटील यांनी केले तर आभार प्रा.तरंगे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व गणित विभागाचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.