चांदोली धरणाचे दोन दरवाजे उघडले

वारणा नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

चांदोली, बुधवार दि.26 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) चांदोली धरणक्षेत्रात पडणार्‍या मुसळधार पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असुन धरणातील पाणी सांडवा पातळीपर्यत पोहचल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रीत करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडण्यात आले व चांदोली धरणाच्या सांडव्यातुन वारणा नदी पात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. सध्या चांदोली धरणाच्या सांडव्यातुन १५४५ क्युसेक्स तर वीजनिर्मीती केंद्रातुन ९११ असे एकुण २४५६ क्युसेक्स पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात येत असल्याने वारणेच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असुन वारणानदिचे पाणी पात्राबाहेर पडले असल्यामुळे चांदोली धरण प्रशासनाकडुन नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात धरणक्षेत्रात ७१ मी.मी इतकी अतिवृष्टी झाली असुन मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आज सकाळी पाणीपातळी सांडवापातळीपर्यंत धरणाच्या सांडव्यातुन विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ६२०.४० मीटर इतकी असुन चांदोली धरण २८ टि.एम.सी म्हणजेच ८१.२७ टक्के इतके भरले आहे. चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडण्यात आल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असुन नदीकाठच्या पोटमळीत शिरण्याची शक्यता आहे त्यामुळे नदी काठच्या गावांना धरण प्रशासनाकडुन सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.