कोल्हापूर एन डी आर एफ पथकाची कामगिरी
शिराळा, शुक्रवार दि.28 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा, नथुराम कुंभार) शिराळा तालुक्यातील मांगले – काखे पुलाजवळ वारणा नदीच्या पुराच्या पाण्यात तब्बल बारा तास अडकून पडलेल्या लादेवाडी येथील बजरंग पांडुरंग खामकर या ५८ वर्षाच्या व्यक्तीस कोल्हापूर जिल्हा आपत्ती निवारण पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशनने पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यास यश आले. काल रात्री नऊच्या सुमारास बजरंग खामकर हे लादेवाडी हुन पन्हाळा तालुक्यातील कोडोली या गावाकडे चालले होते. मांगले – काखे या वारणा नदीवरील पुलावर आल्यानंतर त्यांनी मोटारसायकल पुलावर लावून ते पाणी पिण्यासाठी म्हणून नदीपात्रात उतरले असल्याचे समजते. त्यावेळी त्यांचा पाय घसरल्यामुळे ते पुराच्या पाण्यात पडले तर पाण्याच्या प्रवाहाबरोबर सुमारे पाचशे मीटर वर जाऊन ते कांदे गावच्या बाजूच्या झाडात अडकले, झाडाच्या फांदीचा आसरा घेऊन त्यांनी अखंड रात्र याच झाडावर बसून काढली. या घटनेची माहीत मिळताच मदतीसाठी कोल्हापूर हुन एन डी आर एफ च्या पथकास पाचारण करण्यात आले. पथकातील जवानांनी बोटीच्या साहाय्याने खामकर यांना सुखरूप पाण्याच्या बाहेर काढले. खामकर यांच्या तब्बल 12 तासातील पाण्यातील जगण्याच्या या संघर्षमय लढाईस अखेर एन डी आर एफ च्या पथकाच्या मदतीने यश आले.महाराष्ट्र मराठी न्यूज नथुराम कुंभार शिराळा

