चांदोली धरणाचे चारीही दरवाजे बंद

चांदोली, रविवार दि.6 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) चांदोली धरणक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे धरणात डोंगरमाथ्यावरुन येणार्‍या पाण्याची आवक मंदावल्याने धरणाच्या पाणी पातळीतही घट होवु लागली आहे त्यामुळे धरण प्रशासनाकडुन चांदोली धरणाचे चारीही दरवाजे आज सायंकाळी पाच वाजता बंद करण्यात आले आहेत. मात्र वीज निर्मीती केंद्रातुन १५९० क्युसेक्स इतका विसर्ग वारणानदिपात्रात सोडण्यात येत आहे. चांदोली धरणाच्या मुख्य सांडव्यातुन वारणानदिपात्रात होणारा विसर्ग बंद झाल्यामुळे वारणानदिच्या पाणिपातळीत घट होत असुन पात्राबाहेर पडलेले वारणा नदिचे पाणी पात्रात परतु लागल्यामुळे नदिकाठच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. चांदोली धरणक्षेत्रात शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासात केवळ ५ मि.मी तर आजअखेर १३४६ मीलीमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. चांदोली धरणाची पाणीपातळी ६२१.२५ मीटर इतकी होती तर धरणात सध्या २८.९० टि.एम.सी पाणीसाठा होता.