तासगाव-महांकाळच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक 2026, आमदार रोहित पाटील यांची पत्रकार परिषद

तासगाव, शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसंत पंचमीच्या मुहूर्तावर तासगाव व महांकाळ तालुक्यांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा अधिकृत जाहीरनामा आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. तासगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार, समर्थक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा जाहीर करण्यात आला. यावेळी अविनाश पाटील, हणमंतराव देसाई, शंकर दादा पाटील, विश्वास पाटील, मोहन पाटील, पतंग माने, साहेबराव पाटील, युवराज पाटील, अमोल शिंदे व आत्माराम पाटील यांच्या सह दोन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या जाहीरनाम्यात केवळ आश्वासने नसून ठोस विकासाचा आराखडा असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस व संत तुकाराम महाराज यांना अभिवादन करून विकासाचा वसंत फुलविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे :१) कृषी व जलसिंचन : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत जलसिंचन योजना, आधुनिक शेती सुविधा तसेच मृदा व जल परीक्षण प्रयोगशाळा स्थापन.२) पाणीपुरवठा व बीज : प्रत्येक घराला स्वच्छ पिण्याचे पाणी व शेतीसाठी भरपूर बियाणे उपलब्ध करून देणे.३) ग्रामीण पायाभूत सुविधा : पक्के रस्ते, गटार व्यवस्था व ग्रामविकासाला चालना.४) महिला व बालविकास : बचत गटांचे बळकटीकरण, अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण व बालविकासावर भर.५) शिक्षण व आरोग्य : शाळांचा दर्जा सुधारणे, डिजिटल वर्गखोल्या, प्राथमिक आरोग्य केंद्रांत सुविधा वाढविणे व रुग्णवाहिका सेवेला विस्तार.६) युवक कल्याण : कौशल्य प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वाचनालये व व्यायामशाळा उभारणे.७) समाजकल्याण : दुर्बल घटकांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व प्रशासनात पारदर्शकता.तासगाव व कडे महांकाळ पंचायत समित्यांमध्ये सत्तेत आल्यास जिल्हा परिषद शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याचा ठराव करण्याचा निर्धारही यावेळी जाहीर करण्यात आला. तसेच लोकांना न्याय देणारा हा जाहीरनामा असून विकासाच्या प्रवासात जनतेने भक्कम साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले.महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा करत अभिमानाने जनतेसमोर जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. हा मतदारसंघ सुज्ञ असून या दोन तालुक्यांमध्ये विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक होईल, असा विश्वास व्यक्त करत सर्वसामान्य जनतेचे कल आपल्याच बाजूने असल्याचा दावा करण्यात आला.