तासगाव, ता. २५ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी वृतसेवा) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पदमभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील २ कॅडेट्सची नवी दिल्ली येथे होणाऱ्या २६ जानेवारी रोजीची प्रजासत्ताक दिन संचालनासाठी निवड झाली.
सिनिअर अंडर ऑफिसर आसिफ खलील मुजावर व ज्युनिअर अंडर ऑफिसर सानिया प्रवीण पाटील अशी त्यांची नावे असून त्यांनी महाविद्यालयाची परंपरा कायम राखत यावर्षीच्या आरडीसी कॅम्पला जाण्याचा बहुमान मिळविला आणि तासगावकारांची मान अभिमानाने उंचावली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली याठिकाणी होणाऱ्या संचलनासाठी निवड ही अत्यंत सन्मानाची बाब मानली जाते. यात भारतातील सर्व राज्यांतून १७ एनसीसी डायरेक्टोरेट मधून छात्रसैनिक सहभागी होतात. ऑगस्ट महिन्यापासून या कॅम्प साठीच्या निवडीची प्रक्रिया सुरू होते. लेफ्ट राईट लेफ्ट करत १०दिवसांचे १०कॅम्प मधून विविध निकष पूर्ण करून मोजकेच कॅडेट्स या राष्ट्रीय कॅप साठी निवडले जातात. तासगाव महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने सन २०१४पासून सलग ९वर्षामध्ये ९ कॅडेट्सची नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी निवडीची उत्कृष्ट परंपरा राखली आहे. या विभागाची धुरा एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. विनोदकुमार कुंभार सांभाळत आहेत.
यापूर्वी सिनिअर अंडर ऑफिसर अभिजित भोसले, जयदीप पाटील, लक्ष्मण ढंगोळी, सुरज झांबरे, धनराज झांबरे, सौरभ पाटील या कॅडेट्सनी दिल्ली येथील संचलनाचा बहुमान मिळवला आहे आणि अशीच यशाची अखंड परंपरा यावर्षीही या दोन कॅडेट्सनी कायम राखली.
याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमारसो साळुंखे ,सचिव मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यर्थिनी यांनी अभिनंदन केले ,तसेच १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सांगलीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. डी. नातू, ऍडम ऑफिसर कर्नल कैलास चंद्र, प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, महाविद्यालयाचे एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. विनोदकुमार कुंभार, सुभेदार मेजर हनुमंत जाधव, सर्व पीआय स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले.तासगावच्या या एनसीसी छात्रांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
