डोंगरसोनीचे शहीद जवान गणपत भोसलेना अखेरचा सलाम

डोंगरसोनीत शासकीय इतमामात अंत्यविधी ; मान्यवरांकडून श्रद्धांजली

तासगाव, दि.२९ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा)

तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावचे सुपुत्र शहीद जवान गणपती शंकर भोसले यांच्या पार्थिव देहावर रविवारी (दि.२९) डोंगरसोनी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव सकाळी गावत आल्या नंतर मुख्य रस्त्यावरून बॅनर, हार-फुलेनी सजवलेल्या ट्रॅक्टर मधून भावपूर्ण वातावरणात अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी तालुक्यातील मान्यवर व्यक्तिंनी त्यांच्या पार्थिव देहास पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली. ते भारतीय सैन्य दलात आसाम (तेजपुर) येथे १८१२ पायनियर युनिट मध्ये नाईक पदावरती कार्यरत होते. यकृताच्या आजाराने शनिवारी पुणे येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. ते ४२ वर्षाचे होते.


शनिवारी गणपती भोसले यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली होती. रविवारी सकाळी अकरा वाजता गणपती भोसले यांचे पार्थिव डोंगरसोनी येथे आणण्यात आले. पार्थिव दारात येताच कुटूबिंयांनी हंबरडा फोडला. यावेळी ग्रामस्थांचे अश्रूंचे बांध फुटलेले होते.
सजवलेल्या ट्रॅक्टर मधून गावातून गणपती भोसले यांचे पार्थिव ग्रामपंचायत समोर आणले. याठिकाणी पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. ग्रामस्थांनी येथे या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. अंत्यविधीसाठी पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले.
येथे आमदार सुमन पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, ताजुद्दीन तांबोळी, तासगावचे नायब तहसीलदार नागेश गायकवाड, सावळज मंडल अधिकारी वसंत पाटील, सरपंच राणीताई झांबरे, उपसरपंच किशोर कोडग, ग्रामपंचायत सदस्य अमित झांबरे, चंद्रकांत मोहिते, राजाराम झांबरे, अभिजित झांबरे, ग्रामसेवक सुखदेव मोरे, तलाठी संदीप कांबळे यांच्यासह सैन्यातील अधिकारी, जवान यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. सैन्याच्या जवानांनी सलामी दिलेनंतर त्यांच्या मुलाने पार्थिवास अग्नी दिला.

चौकट : गणपती भोसले यांचा अल्पपरिचय
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गणपती भोसले यांनी आपले शिक्षण घेतले होते. दहावीपर्यंतचे शिक्षण डोंगरसोनी हायस्कूल मध्ये घेतले. नंतर ते भारतीय सैन्यदलात भरती झाले. ते एक चांगले चित्रकार होते. भरती होण्यापूर्वी गावात गणेश पेंटर नावाने परिचित होते. विविध पेंटिंगच्या माध्यमातून आपली कला जोपासली होती. गावात हनुमान मंदिरातील भिंतीवर त्यांनी साकारलेली श्री गणेशाचे, श्री. शंकराचे, श्रीराम आणि हनुमानाची तैलचित्रे आहेत. अत्यंत शांत, मनमिळावू स्वभावाच्या गणपती यांनी मोठा मित्र परिवार जोडला होता.