तृतीयपंथीयांच्यावरील संशोधन, वर्ल्ड पीस इन्स्टिटयूट व दिल्ली सरकार कडून सन्माननीत
तासगाव, दि.11 फेब्रुवारी 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
समाज मनाकडून उपेक्षित आणि दुर्लक्षित तृतीयपंथीयावर संशोधना साठी प्रा. प्रतिभा पैलवान यांना वर्ल्ड पीस इन्स्टिटयूट व दिल्ली सरकार कडून मानद डॉक्टरेट हा पदवी प्रदान करण्यात आली. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दोन्ही संस्था कडून त्यांना हा पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा. पैलवान या मुळच्या तासगाव येथील असून सध्या त्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित,श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी विभागात कार्यरत आहेत. यांनी आता पर्यंत 200 हून अधिक तृतीयपंथीयांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या वेदना जाणून घेतल्यानंतर त्यांच्या मनाची जी काही उलथापालथ झाली, जे काही सत्य असत्य समोर आले त्याचा लेखाजोखा त्यांनी आपल्या संशोधनामध्ये मांडलेला आहे. खरं तर समाजामध्ये तो आणि ती या दोनच जातींना मानाचे स्थान दिलं जातं परंतु या तो आणि ती मध्ये “ते” सुद्धा आहेत हे आपण सोयीस्कररित्या विसरतोय.
तृतीयपंथीयांच्या संवेदनशील आयुष्यावर प्रकाश टाकणारा त्यांचा एक कवितासंग्रही प्रकाशित झाला आहे. “तो,ती आणि ते राजहंस” या कवितासंग्रहाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातून प्रादेशिक भाषा मराठी विभागात समावेश झाला आहे. ही निश्चितच अभिमानास्पद कामगिरी आहे. पन्नासहून अधिक तृतीयपंथीयांच्या कथांचा एक कथासंग्रह ही लवकरच प्रकाशित होत आहे. तृतीयपंथीयांना समाजाचा एक अविभाज्य भाग बनवण्यासाठी,त्यांना माणूस म्हणून माणसासारखी वागणूक देण्यासाठी इथून पुढचे संशोधन आणि लढा सुरू राहणार आहे,असे त्या म्हणाल्या. या कार्यासाठी प्रा.पैलवान यांचे समाजातील सर्व स्तरातून खूप कौतुक होत आहे. त्यांनी उचललेले हे एक अत्यंत धाडसी पाऊलच म्हणावे लागेल. तृतीयपंथीयांच्यावरील या संशोधनाची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संघटनांनी घेतली हेच या संशोधनाचे खरे यश म्हणावे लागेल. जगातील सर्व तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक देण्यासाठीची असे प्रतिपादन प्रा.प्रतिभा पैलवान यांनी केले.
या कार्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख आणि महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाचे सन्माननीय सदस्य डॉ.राजीव यशवंते सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ. त्रिशला कदम मॅडम, प्रा.संगीता पाटील मॅडम तसेच महाविद्यालयातील सर्वच गुरुदेव कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.
