सांगली, दि. २० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या करणाऱ्यांना शिक्षा करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर समविचारी पक्ष व जन संघटनांचे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये नंदकुमार हत्तीकर, रमेश सहस्रबुद्धे, विजय बचाटे, आयुब शेख, जनता दल सेक्युलरचे के डी शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे अजितराव सूर्यवंशी, रेशनिंग कृती समितीचे शाहीन शेख, ओबीसी परिषदचे सुनील गुरव, गौतम कांबळे, वर्षा गडचे, रावसो पाटील, राहुल जाधव, शशिकांत गायकवाड उपस्थित होते. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉ. गोविंद पानसरे त्यांच्यावर कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ अज्ञात हल्लेखोरानी बे-छूट गोळीबार करीत त्यांची हत्त्या केली. या हल्ल्यात त्यांच्या पत्नी कॉ. उमाताई पानसरे गंभीर जखमी झाल्या. उमाताई बचावल्या. या घटनेला आता आठ वर्षे लोटली मात्र त्यांच्या हत्त्याराना व मुख्य सुत्रधारांना उद्याप ही पकडले गेले नाही कि कोणास शिक्षा झालेली नाही. आजपर्यंत तपास विशेष तपास पथकाकडे (एस.आय.टी.) होता आणि आता तो दहशवाद विरोधी पथकाकडे (ए.टी.एस.) सोपविण्यात आला आहे. या पूर्वी महाराष्ट्रात नरेंद्र दाभोळकर, कर्नाटकात गौरी लंकेश, कलबुर्गी या पुरोगामी प्रबोधनकारांनाही असेच संपविण्यात आले आहे. कॉम्रेड पानसरे यांच्या मारेकर्यांना त्वरित जेरबंद करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे गृह खाते, त्यांच्या तपासयंत्रणांना कार्यक्षमतेने कामाला लावून न्यायालयास योग्य ते पुरावे सादर करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.
