सुमंगलम विचार संपदा पुस्तकातून पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींच्या विचारांचा संग्रह – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर, दि.२० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) “पर्यावरण संवर्धनाच्या जागरासाठी सुमंगलम लोकोत्सव कार्यक्रम हा प्रेरणादायी ठरणार असून “सुमंगलम विचार संपदा” हे पुस्तक श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या विचारांचा संग्रह आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव समारंभाच्या उद्घाटन सोहळ्यात पत्रकार गुरुबाळ माळी लिखित “सुमंगलम विचार संपदा” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी तर अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य भैय्याजी जोशी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्वामीजींचे अध्यात्म आणि विज्ञान यांचा सांगड घालत समाजाची उन्नती साधण्याचे विचार कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून नागरिकापर्यंत पोहोचणार आहे. स्वामीजींच्या विचार कार्यावर आधारित या पुस्तकामुळे पर्यावरण जागर, अध्यात्माचे महत्त्व, अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून झालेला समाजाचा विकास हे सारे समाजातील वेगवेगळ्या घटकांना नेहमी चांगल्या कामासाठी प्रवृत्त करेल. पत्रकार गुरुबाळ माळी यांचे हे अकरावे पुस्तक आहे. अक्षर दालनने ते प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या निर्मितीचे उपस्थित साऱ्याच नेत्यांनी कौतुक केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार अण्णासाहेब जोले, आमदार प्रकाश आवाडे आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, राज्य पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.