शिराळा, दि. २५ फेब्रुवारी २०२३ (नथुराम कुंभार – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आले तरच आदर्श समाज घडेल त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार व्हा असे प्रतिपादन शिव व्याख्याते जितेंद्र लोकरे यांनी केले. बेलदारवाडी ता. शिराळा येथे शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकरे यांनी आपल्या व्याख्यानात आत्ताची बदलत चाललेली संस्कृती व छत्रपती शिवरायांच्या काळातील संस्कृती याचे विदारक सत्य मांडले. राजमाता जिजाऊची महती, छत्रपतींची मातृ महिमा, आदर्श व्यवस्थापन, बाजीप्रभूंची स्वामिनिष्ठा, यांसारख्या अनेक उदाहरणांमधून आदर्श समाज कसा निर्माण करता येईल याबाबत माहिती सांगितली. सध्या फोफावत चाललेले व्हॅलेंटाईन डे, प्रपोज डे, प्रॉमिस डे, या प्रथांना कडाडून विरोध केला. प्रॉमिस काय असते ते बाजीप्रभू नां विचारा, हग डे काय असतो हे अफजल खान भेट उदाहरणातून स्पष्ट केले. लोकांनी आपले आचरण कसे ठेवावे, आपल्या संस्कृतीचा कसा विकास होईल याचा समाजाने विचार करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यावर होणारे संस्कार हे मुलता घरातूनच होत असतात, पालकांनाही आपले आचरण अशा पद्धतीने ठेवावे त्याचा चांगला परिणाम त्यांच्या मुलावर होईल. अशाप्रकारे विविध उदाहरणांमधून चांगला समाज कसा निर्माण होईल याबाबत मार्गदर्शन विशद केले. यावेळी शिवजयंती उत्सव बेलदारवाडी चे सर्व शिवभक्त उपस्थित होते. निलेश शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत अमोल जाधव यांनी केले. आभार तानाजी कदम यांनी मानले.
