शिराळा, दि.8 मार्च 2023 (नथुराम कुंभार, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शिराळा तालुक्यातील नाठवडे येथे शेतकरी शंकर विष्णू वनारे, सुरेश शंकर वनारे व रमेश शंकर वनारे यांच्या सामूहिक जनावरांच्या शेडला अचानक आग लागून संपूर्ण शेड जळून खाक झाले. शेड मधील तीन जनावरांची या भिषण आगीतून सुटका करण्यात आली. एक म्हैस पन्नास टक्के भाजली असून एका म्हैशीचा होरपळून जागीच मृत्यू झाली. या दुर्घटनेत अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शेडगेवाडी – चांदोली मुख्य रस्त्यावर नाठवडे येथे शंकर विष्णू वनारे, सुरेश शंकर वनारे व रमेश शंकर वनारे यांचे 20 बाय 70 चे जनावरांचे शेड आहे. बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान शेडला अचानक आग लागली.शेडला आग लागल्याचे निदर्शनास येताच उपस्थित ग्रामस्थांनी शेड मधील चार जनावरांच्या पैकी तीन जनावरांची सुटका केली. अग्निशामक गाडीच्या साह्याने शेडला लागलेली भिषण आग आटोक्यात आण्यात आली. या भिषण आगीत शेड, जनावराचा चारा, शेती ओजारे, कोंबड्या व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. एक म्हैस जागीच होरपळून मृत्यूमुखी पडली. तर एक म्हैस पन्नास टक्के भाजलेली आहे. तलाठी विष्णू गुरव यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला.


