अतिवृष्टीमुळे नियोजित कार्यकर्ता संवाद मेळावा रद्द – माजी खासदार संजय काका पाटील

सुधारित तारीख विजयादशमी दसऱ्या जाहीर करणार

शनिवार, दिनांक 27 सप्टेंबर 2025 तासगाव (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शुक्रवार सकाळ पासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आज शनिवार, 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता तासगाव विटा रोड वरील जनाई मंगल कार्यालयात आयोजित केलेला कार्यकर्ता संवाद मेळावा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हाय अलर्ट दिला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, तसेच गरज नसेल तर कोणी घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. सांगली लोकसभा आणि तासगाव कवठेमंकाळ विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर गेली बरेच महिने माजी खासदार संजय काका पाटील राजकारणात फारसे सक्रिय दिसले नाहीत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत व इतर सर्वच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संजय काका पाटील यांनी जाहीर केले असून, कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी आणि आपली राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी त्यांनी या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. पण सर्वत्र अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे हा नियोजित संवाद कार्यकर्ता मेळावा स्थगित करण्यात आला असून विजयादशमी दसऱ्यानंतर या संवाद मेळाव्याची नवी सुधारित तारीख जाहीर केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.