न्यूज अँकर विलास बडे, ग्रामीण कथाकार रविंद्र कोकरे , कवी अरुण पवार यांची व्याख्याने
तासगाव, बुधवार दिनांक – 18 फेब्रुवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. ( आबा ) पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोहित (दादा) कल्चरल ग्रुप व जिव्हाळा सोशल फाऊंडेशनच्या वतीने तासगाव येथे रविवार दि. 22 ते मंगळवार दि.24 फेब्रुवारी या कालावधीत लक्षवेधी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती रोहितदादा कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, आर. आर .पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेलं व्यक्तिमत्व. जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे उपमुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास स्वकर्तृत्वाचा. सत्ताकाळात त्यांनी दूरदृष्टीने घेतलेले निर्णय , राबविलेल्या योजना अत्यंत प्रभावी ठरल्या आहेत. वक्तृत्व आणि कर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनावर वेगळा ठसा उमटविणाऱ्या आर. आर. आबांच्या स्मृती जपल्या जाव्यात या हेतूने रोहितदादा कल्चरल ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त लक्षवेधी व्याख्यानमाला आयोजित केली आहे. तासगाव येथील रोहितदादा कल्चरल ग्रुपच्यावतीने यंदा लक्षवेधी व्याख्यानमालेचे 11 वे वर्ष आहे. व्याख्यानमालेचा प्रारंभ रविवार दि.22 रोजी तासगाव येथील नगरपरिषदेच्या साने गुरुजी नाट्यगृहात सायंकाळी 6.30 वाजता जिल्हाधिकारी डॉ.अशोक काकडे यांच्याहस्ते व आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प रविवार दि.22 रोजी ‘न्यूज 18 मराठीचे’ न्यूज अँकर विलास बडे ( मुंबई ) यांच्या ‘लोकशाही : काल, आज आणि उद्या’ या विषयावरील व्याख्यानाने गुंफले जाणार आहे. आ.रोहित पाटील अध्यक्षस्थानी आहेत. यावेळी नगराध्यक्षा विजया बाबासाहेब पाटील , वासंती बाळासाहेब सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुसरे पुष्प सोमवार दि.23 रोजी ग्रामीण कथाकार रविंद्र कोकरे (बारामती) यांच्या ग्रामीण विनोदी कथाकथनाने गुंफले जाणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे आहेत. माजी आ.सुमनताई पाटील, तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील व तासगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मंगळवार दि.24 रोजी तिसरे व अखेरचे पुष्प प्रख्यात कवी प्राचार्य अरुण पवार (परळी वैजनाथ) यांचा ‘काळजातल्या कवितां’ नी रंगणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अध्यक्षस्थानी आहेत. तर तहसीलदार अतुल पाटोळे, तासगाव नगरपरिषदेतील राष्ट्रवादी (श. प.) पक्षाच्या गटनेत्या सुशीला जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. व्याख्यानमाला दररोज सायंकाळी 6.30 वाजता तासगाव येथे साने गुरुजी नाट्यगृहात होणार आहे. संयोजन स्वप्नील जाधव, रामचंद्र माळी, पत्रकार दत्तात्रय सपकाळ व रोहितदादा कल्चरल ग्रुप, जिव्हाळा सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते करीत आहेत.

