इंधन तुटवडा नाही — तहसीलदार अतुल पाटोळे

अफवांवर विश्वास नको, अन्यथा कारवाई निश्चित

तासगाव, मंगळवार दिनांक – 24 मार्च 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शहरात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांनी अचानक जोर धरल्याने काही पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करत स्पष्ट केले की, तासगाव व परिसरात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.तहसीलदार अतुल पाटोळे यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, पेट्रोल संपल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, घाबरून अनावश्यक गर्दी करू नये.अफवांमुळे काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या होत्या. मात्र प्रशासनाने वेळीच उपाययोजना करत परिस्थिती सुरळीत केली. कोणताही प्रत्यक्ष तुटवडा नसताना केवळ अफवांमुळे ही घबराट निर्माण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.यावेळी तहसीलदार पाटोळे यांनी इशारा देत सांगितले की, जाणीवपूर्वक अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.नागरिकांनी संयम राखून नेहमीप्रमाणेच इंधन भरावे, असे आवाहन केले तर कोणतीही शंका असल्यास केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाचे स्पष्ट निर्देश दरम्यान, तासगावात अफवांपेक्षा वास्तव वेगळे असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची खात्री प्रशासनाने दिली आहे.