नगरपालिका निवडणूक : भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील मैदानात
तासगाव, गुरुवार दिनांक – 27 नोव्हेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव नगरपालिकेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच गटांनी आपली ताकद पणाला लावली आहे. येथील राजकारण फक्त दोन कुटुंबांभोवती फिरत होते. मात्र या निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिसरा पर्याय शहरवासियांसमोर ठेवला आहे. गेल्या तीन चार दशकात प्रथमच तिसरे पॅनेल तासगावात उभे आहे. या पॅनेलच्या प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या (शुक्रवार) तासगावात येत आहेत. येथील वंदे मातरम चौकात दुपारी अडीच वाजता त्यांची सभा होत आहे. आजपर्यंत तासगावच्या राजकारणात स्व. आर. आर. पाटील व माजी खासदार संजय पाटील हे दोनच गट अस्तित्वात होते. या दोन्ही घराण्यांनी तिसरा पर्यायच तयार होऊ दिला नाही. काहींनी तिसरा पर्याय म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांनी त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे या दोन्ही कुटुंबाभोवतीच येथील राजकारण फिरत राहिले. मात्र भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी पालिका निवडणुकीच्या निमित्ताने तिसरा पर्याय जनतेसमोर ठेवला आहे. पाटील यांनी सर्व घटकांना न्याय देत नगराध्यक्षांसह २५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. आबा काका गटाच्या एकाधिकारशाहीला यानिमित्ताने शह देण्याचा प्रयत्न होणार आहे. पालिका निवडणुकीत भाजपच्या एन्ट्रीमुळे चुरस वाढली आहे. भाजपने विद्या सागर चव्हाण या सुशिक्षीत महिलेला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. त्यांनी एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. नवीन पर्याय म्हणून तासगावकर त्यांच्याकडे पाहत आहेत. त्यांच्या रुपाने पालिकेवर कमळ फुलेल, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीत सर्वसामान्य घरातील, तळागाळातील कार्यकर्त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हे उमेदवार यश खेचून आणतील, असा भाजपला विश्वास आहे. भाजपच्या पॅनेलने ‘घर टू घर’ प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या उमेदवारांना मतदारांचा पाठींबा मिळत आहे. त्यामुळे या उमेदवारांना ताकद देण्यासाठी पालकमंत्री पाटील उद्या मैदानात उतरत आहेत. त्यांची येथील वंदे मातरम चौकात सभा होत आहे. सभेला तासगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वप्नील पाटील यांनी केले आहे.
