तासगावात २८ रोजी सरपंच मेळावा

जयंत पाटील यांची माहिती : चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे, उदय सामंत यांची उपस्थिती

तासगाव, दिनांक – 23 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जिल्ह्यातील गावागावात अनेक अडचणी आहेत. गावगाड्यात काम करताना सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे गावांच्या विकासकामांवर परिणाम होत आहे. त्यासाठी सरपंच व प्रशासन यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी तासगाव येथे शुक्रवार दि. २८ मार्च रोजी परशुराम मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मेळाव्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने, जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग, मुख्य संघटक अरुण खरमाटे, आर. डी. पाटील, विशाल शिंदे उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सरपंच आपापल्या गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशिल असतात. मात्र कामे करीत असताना अनेक प्रशासकीय अडचणी येत आहेत. बऱ्याचवेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. प्रशासन आणि सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ही विकासाची दोन चाके आहेत. सर्वांनी हातात हात घालून कामे केल्यास गावचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. मात्र कुठंतरी सरपंच व प्रशासनामध्ये दरी असल्याचे दिसून येत आहे. ही दरी कमी करुन सर्वांनी एकत्रित येऊन गावगाडा चालवण्यासाठी आम्ही ‘सरपंच संवाद मेळावा’ ही संकल्पना पुढे आणली आहे. सांगली जिल्ह्यातील मेळाव्याने त्याची सुरुवात होत आहे. आमागी काळात राज्यभरात प्रशासनाला सोबत घेऊन असे मेळावे घेण्यात येणार आहेत. ते म्हणाले, सरपंच आणि प्रशासन यांचा थेट आणि निकोप संवाद झाला पाहिजे. सरपंचांना गावच्या अडीअडचणींसंदर्भात थेट जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटता आले पाहिजे. सरपंचांमध्ये अधिकाऱ्यांना थेटपणे भेटण्याचे, त्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण झाले पाहिजे, यासाठी हा मेळावा घेत आहोत. या मेळाव्यात जिल्ह्यातील सरपंच, प्रशासन एकत्रित येणार आहे. अनेक विषयांवर विचारमंथन केले जाणार आहे. सरपंच, उपसरपंचांना विमा संरक्षण, पेन्शन लागू करणे, घरकुलांच्या निधीमध्ये वाढ करणे, १५ व्या वित्त आयोगाचा जादा निधी मिळावा, प्रत्येक गावांत स्वतंत्र ग्रामसेवक मिळावा, डाटा ऑपरेटरची नेमणूक करण्याचे अधिकारी ग्रामपंचायतींना द्यावेत, कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध वाढवणे, स्वच्छता विभागासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती, मुंबईत सरपंच भवन उभारावे, रोजगार हमीच्या कामांना जादा निधी मिळावा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, ग्रा. पं. सदस्यांच्या मासिक मिटींगच्या भत्त्यामध्ये वाढ व्हावी, वार्डाच्या विकासासाठी स्वतंत्र निधी मिळावा, केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने विविध योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतींना द्यावा, यासह अन्य मागण्या या मेळाव्यात करण्यात येणार आहेत. मेळाव्यात सरपंच, उपसरपंचांच्या अडचणी मंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहेत. या मेळाव्यामुळे प्रशासकीय अडचणी दूर होऊन गावचा विकास साधण्यासाठी मदत होणार आहे. विविध योजना गावात आणून त्यातून ग्रामविकास साधता येणार आहे. हा सरपंच संवाद मेळावा म्हणजे एकदिवशीय कार्यशाळाच असेल, असे मत जयंत पाटील यांनी शेवटी व्यक्त केले.