तासगाव पंचायत समितीवर माजी खासदार संजयकाका पाटील गटाचे वर्चस्व, ८ पं. स. उमेदवार विजयी

तासगावात आमदार रोहित पाटील गटाला धक्का : तासगांव पंचायत समितीमधील ३५ वर्षांची सत्ता खालसा

तासगांव, ता. 9 फेब्रुवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सांगली जिल्हा परिषद व तासगांव पंचायत समिती निवडणुकीकरिता मतदान झाले होते. यामध्ये मुख्यत: आमदार रोहित आर. आर. पाटील गट व माजी खासदार संजयकाका पाटील गट यामध्येच लढत झाली. या लढतीमध्ये तासगांव पंचायत समितीवर आर. आर. पाटील गटाची ३५ वर्षांपासून असणारी सत्ता संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी उलथवुन टाकली. हा आमदार रोहित पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. आर. आर. पाटील आमदार झाल्यापासून तासगांव पंचायत समितीवर त्यांचे व त्यांच्या कुंटुंबाचे एक हाती वर्चस्व होते. प्रत्येक निवडणूकीत संजयकाका पाटील यांचे गटाशी त्यांची काटयाची टक्कर होवून सत्ता कायम राखण्यात आर. आर. पाटील गटाला नेहमी यश मिळत होते. परंतु यावेळच्या पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीत संजयकाका पाटील गटाने शर्थीचे प्रयत्न करुन आर. आर. पाटील गटाची एकहाती सत्ता उलथवुन निर्विवादपणे वर्चस्व स्थापित केले आहे. यामुळे आर. आर. पाटील गटाची ३५ वर्षांपासुन असणारी सत्ता माजी खासदार संजयकाका पाटील यांनी काबीज केली आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांचे गटातून ८ इतके पंचायत समिती सदस्य निवडून आले असून आमदार रोहित पाटील गटाचे मात्र ३ इतके सदस्य निवडून आलेले आहेत. तसेच भाजपने खाते उघडून १ जागा जिंकली.
माजी खासदार संजयकाका पाटील गटाचे शशिकांत जमदाडे मणेराजुरी जि. प. गटातून विजयी झाले, तसेच येळावी जि. प. गटामध्ये कॉंग्रेसचे उमेदवार अमित पाटील यांना संजयकाका पाटील गटाने पाठिंबा दिला होता, ते ही जि. प. सदस्य म्हणून निवडून आले.

माजी खासदार संजयकाका पाटील यांचेकडून हा विजयी अजितदादांच्या स्मृतीस समर्पिंत.- गेल्या ३५ वर्षापासून विरोधकांकडे असणारी तासगांव पंचायत समितीची सत्ता काबीज केल्यानंतर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी हा विजय खऱ्या अर्थांने जनतेचा असून हा विजय आम्ही सर्व अजितदादांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करीत आहोत. तासगांव पंचायत समितीमध्ये पारदर्शक व चांगला कारभार करणेकरिता सर्व सदस्य प्रयत्नशील असतील, अशी ग्वाही माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली. तासगाव पंचायत समितीचा विजय अजितदादांच्या स्मृतीस समर्पित करतो. तासगाव नगर परिषद व कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदानंतर आता तासगाव पंचायत समितीची सत्ताही जनतेने आमच्याकडे देवून आमच्यावर विश्वास दाखवला आहे. हा विश्वास सार्थ ठरवतानाच जनतेच्या सेवेसाठी समर्पित होवून पारदर्शक व लोकसेवेचे काम आमच्या सर्व सदस्यांकडून होईल याची मी ग्वाही देतो. तसेच जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला घेतल्याशिवाय सत्ता स्थापीत होवू शकणार नाही हेही या निकालातून स्पष्ट झालेले आहे.”