मिरज, बुधवार दिनांक – 18 फेब्रुवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) दैनिक पुण्यनगरीचे सांगली ब्यु्रो चीफ दत्ता कुलकर्णी यांना उत्कृष्ट व निष्ठावान पत्रकारितेबद्दल ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार मंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा भव्य पुरस्कार सोहळा मिरज येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट, अंबामाता तालीम मिरज येथे उत्साहात आणि दिमाखात पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारितेतील योगदानाबद्दल दत्ता कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. दत्ता कुलकर्णी यांनी सांगली जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या प्रश्नांना नेहमीच प्रभावीपणे वाचा फोडली आहे. त्यांच्या धाडसी, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांवर केंद्रित असलेल्या पत्रकारितेमुळे त्यांना हा सन्मान मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना कुलकर्णी यांनी हा सन्मान आपल्या सहकाऱ्यांचा व वाचकांचा असल्याचे नमूद करत, भविष्यातही निःपक्षपाती व समाजाभिमुख पत्रकारिता करण्याचा संकल्प व्यक्त केला. या सन्मानामुळे सांगली जिल्ह्यातील पत्रकारितेचा गौरव वाढला असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
