मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेचा उपक्रम
तासगाव, शनिवार दिनांक – 20 डिसेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज) तासगाव येथील मंगलमूर्ती सेवाभावी संस्था ही दरवर्षी तासगाव तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. विशेषतः हिवाळ्यात निराधार व गरजू नागरिकांसाठी संस्थेकडून अनेक वर्षांपासून ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.संस्थेचे हे समाजोपयोगी कार्य पाहून तासगाव येथील निवृत्त मुख्याध्यापिका सुरेखा बाळासाहेब तावरे यांनी पुढाकार घेत दहा ब्लॅंकेट संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर निकम यांच्याकडे सुपूर्द केल्या. या माध्यमातून थंडीच्या दिवसांत निराधार बांधवांना मायेची उब मिळावी, हाच त्यांचा उद्देश आहे.सुरेखा तावरे यांनी तब्बल ३२ वर्षे शिक्षण क्षेत्रात सेवा बजावली असून त्या चिंचणी येथून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्या आहेत. सेवानिवृत्तीनंतरही समाजाप्रती आपले कर्तव्य जपत त्यांनी केलेल्या या सामाजिक कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेच्या उपक्रमाला लाभलेला हा हातभार निराधारांसाठी दिलासादायक ठरत असून, अशा समाजभान जपणाऱ्या व्यक्तींमुळेच सामाजिक एकोप्याची भावना अधिक बळकट होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
