तासगाव, बुधवार दिनांक – 12 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) रोटरी क्लब तासगावच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सार्वजनिक सुरक्षितता वाढवण्यासाठी तासगाव एस.टी. स्टँड येथे पोलीस सहायता केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन माजी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास रोटरी सदस्य, अधिकारी आणि समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी रोटरी क्लब तासगांव चे अध्यक्ष राजेंद्र विटेकर आणि सचिव किशोर पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच निसर्ग अॅग्रोचे चंद्रकांत खरमाटे यांनी आर्थिक सहाय्य करत प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या केंद्राच्या स्थापनेमुळे बस स्थानकावरील चोरी, छेडछाड आणि अन्य गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळविण्यात मदत होईल. महिलांना, प्रवाशांना आणि नागरिकांना तातडीची मदत मिळण्यास या केंद्रामुळे मदत होणार आहे. तासगावच्या नागरिकांची ही दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे.यापूर्वी रोटरी क्लबने प्रवाशांसाठी सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एस.टी. स्टँड येथे वॉटर आर.ओ.प्युरिफायर बसवला आहे तसेच कंट्रोल केबिन ची सोय केली आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे नागरिक व अधिकाऱ्यांनी रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक केले आहे. या कार्यक्रमास रोटरी क्लब सदस्य, रोट्रॅक्ट सदस्य, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, आणि त्यांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे स्वागत केले.

