मी केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेऊ नका, पोस्टर बॉय म्हणून चमकोगिरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला – संजय पाटील यांचे आव्हान
विटा-म्हैसाळ रस्ता’ २०१६ मध्येच मंजूर: आ.रोहित पाटील यांचा ‘९७५ कोटीं’च्या मंजुरीचा दावा फोल! – श्रेय लाटण्याचा प्रयत्न – प्रभाकर बाबा पाटील
तासगाव, बुधवार दिनांक – 5 नोव्हेंबर 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विटा ते म्हैसाळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपद्रीकरणासाठी ₹९७५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर आमदार रोहित पाटील यांनी हा रस्ता आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केला होता. मात्र, माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या समर्थकांनी यावर तीव्र आक्षेप घेत, सदर महामार्गाला २०१६ सालीच माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली असून, आमदार पाटील निव्वळ श्रेय लाटण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचा थेट आरोप केला आहे. शरीराने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असणारे रोहित पाटील मनाने मात्र सत्ताधारी पक्षात आहेत. भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर बसून राजकारण करणाऱ्या रोहित पाटलानी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका होत असताना व विधानसभेत पक्षाच्या आमदारावर हल्ला झाला होता त्यावेळी प्रतिक्रिया द्यायला तोंड देखील उघडले नाही. गेली महिनाभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ,कर्जमाफीवर आम्ही आंदोलन-उपोषण केले यावेळी देखील हे पोस्टरबॉय शांत होते. उलट भाजपच्या मंत्री आणि नेत्यांच्या गुणगौरवात रमलेल्या रोहित पाटलांनी त्यांची राजकीय भूमिका एकदा स्पष्ट करावी असे आव्हान ही त्यांना यावेळी देण्यात आले. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या समर्थकांनी ठोस पुरावे सादर करत, आमदार रोहित पाटील यांचा ‘९७५ कोटीं’च्या मंजुरीचा दावा फेटाळला आहे. मूळ मंजुरी २०१६ ची: विटा-म्हैसाळ राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी २०१६ सालीच मिळाली होती. त्यावेळी आमदार रोहित पाटील यांचे वय केवळ १६ वर्षे होते. संजय काकांनी केले वर्ग: सुरुवातीला या रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी (मॉनिटरिंग ऑथॉरिटी) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (MSRDC) होती. परंतु, कामाला गती मिळत नसल्याने तत्कालीन खासदार संजयकाका पाटील यांनी हा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडे वर्ग करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली. NHAI कडे वर्ग: त्यांच्या मागणीनुसार हा महामार्ग परत NHAI कडे वर्ग करण्यात आला, ज्यामुळे प्रकल्पाला आवश्यक गती मिळाली. संपूर्ण भूसंपादन (भुमी अधिग्रहण) प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आता केवळ त्याची बजेट प्लेट अहवालात सबमिट केली गेली व त्याला प्राथमिकता मिळाली आहे. म्हणजेच, रस्ता मंजूर होता, केवळ निधीची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाली. आमदार पाटील यांचे योगदान किरकोळ: NHAI च्या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी केवळ तासगाव बायपास संदर्भात किरकोळ बदल सुचवले. ते बदल देखील झाले नाहीत. बैठकीच्या इतिवृत्तातही (Minutes) याचा उल्लेख असून, संपूर्ण महामार्ग मंजूर करण्याचे श्रेय घेण्याचा त्यांचा दावा पूर्णपणे निराधार आहे. “जे काम केले त्याचे श्रेय घ्या, जे केले नाही ते आपणच केले असे म्हणणे योग्य व नितिमत्तेला धरुन होणार नाही. जेव्हा हा महामार्ग मंजूर झाला तेव्हा मा. आमदार महोदयांचे वय १६ वर्षे होते. श्रेय लाटण्याचा प्रयत्न: ९७५ कोटी रुपयांच्या निधीमुळे विटा-म्हैसाळ रस्त्याचे चौपदरीकरण आणि तासगाव रिंग रोडचे काम मार्गी लागणार असले तरी, महामार्ग मंजूर करण्याचे श्रेय आमदार रोहित पाटील घेत असल्यामुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. माजी खासदारांनी अथक पाठपुरावा करून भूसंपादनासह रस्त्याचे सर्व अडथळे दूर केले असताना, केवळ निधीच्या अंतिम मंजुरीची बातमी घेऊन आमदार पाटील स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत, असा स्पष्ट आरोप समर्थकांनी केला आहे. एकंदरीत, विटा-म्हैसाळ महामार्ग प्रकल्पाच्या ऐतिहासिक तपशिलातून, सदर रस्त्याच्या मंजुरीचे मूळ श्रेय माजी खासदार संजयकाका पाटील यांना असल्याचे स्पष्ट होते. आमदार रोहित पाटील यांचा ‘आम्हीच रस्ता मंजूर केला’ हा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. तासगाव नगरपालिका इमारत असो किंवा तासगाव कवठेमंकाळ मतदार संघातील विविध विकासकामे असून संजय काकांनी कामे मंजूर करून आणल्यानंतर केवळ पोस्टर लावून सोशल मीडियावर पोस्टरबाजी करणाऱ्या पोस्टर बॉय रोहित पाटलांनी आता तरी शहाणा व्हावं. स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे रोहित पाटील हे सत्ताधारी नेत्यांच्या लांगुल चलनात व्यस्त असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला. येणाऱ्या काळात या पोस्टर बॉय चे डिजिटल मतदारच उतरवतील,असे प्रभाकर बाबा पाटील यांनी सांगितले.
