वायफळेत 21फेब्रुवारी ला ‘महाराष्ट्र केसरी’ साठी निवड चाचणी

खंडेराया व्यायाम संस्थेच्या मैदानावर 21 व 22 फेब्रुवारीला रंगणार थरार : जिल्ह्यातून 20 मल्लांची होणार निवड

तासगाव, बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील वायफळे येथे 21 व 22 फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याची निवड चाचणी स्पर्धा रंगणार आहे. कुस्तीप्रेमींसाठी हा दोन दिवसांचा थरारक सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे. वायफळे येथील खंडेराया व्यायाम संस्थेच्या भव्य मैदानावर ही निवड चाचणी होणार असून मॅट व माती या दोन्ही प्रकारांमध्ये सामने रंगणार आहेत. या स्पर्धेतून 20 उत्कृष्ट मल्लांची निवड आगामी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नामांकित तसेच उदयोन्मुख मल्लांचे लक्ष या निवड चाचणीकडे लागले आहे. वायफळे येथील जय बजरंग बली कुस्ती आखाड्याला प्रथमच या महत्त्वाच्या निवड चाचणीचे यजमानपद मिळाले आहे. सुमारे 13 वर्षांची परंपरा लाभलेल्या या आखाड्याने तालुक्यात कुस्तीची समृद्ध परंपरा जपली आहे. उपसरपंच पैलवान पंकज पाटील यांच्या पुढाकाराने हा आखाडा गेल्या काही वर्षांपासून सक्षमपणे सुरू आहे. दरवर्षी शिवजयंतीनिमित्त येथे भव्य कुस्त्यांचे आयोजन केले जाते. देशभरातील नामांकित मल्लांनी या मैदानावर हजेरी लावत कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे. या मैदानातून घडलेले अनेक मल्ल आज राज्यस्तरावर चमकत आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे मल्ल याच स्पर्धेतून निश्चित होणार आहेत. या निवड चाचणीत 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 आणि खुला गट अशा विविध वजन गटांमध्ये मॅट व मातीवरील कुस्त्या रंगणार आहेत. डे-नाईट हे सामने होणार असल्याने स्पर्धेला वेगळे आकर्षण प्राप्त झाले आहे. स्पर्धेचे मुख्य नियंत्रक म्हणून उपसरपंच पैलवान पंकज पाटील कार्यरत आहेत. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शामराव नलवडे, अरुण शिंदे, जगन्नाथ घोडके, तानाजी चव्हाण, भगवान घोडके, शिवाजी नलवडे, सुखदेव नलवडे, संपत नलवडे आदींसह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेसाठी माजी खासदार संजय पाटील, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, शहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राहुल पवार, युवा नेते प्रभाकर पाटील, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य शशिकांत जमदाडे, अमित पाटील, समिती सदस्य सुखदेव पाटील, सुनील जाधव, प्रमोद शेंडगे, महेश पाटील, ऋषिकेश बिरणे, उमेश पाटील यांच्यासह जिल्हाभरातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. वायफळे येथे होणारी ही निवड चाचणी म्हणजे कुस्तीप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार असून 21 व 22 फेब्रुवारी रोजी कुस्तीचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कुस्तीशौकिनांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावावी, असे आवाहन पंकज पाटील यांनी केले आहे.