अशोक खाडे यांची भागलपूर आयआयटीच्या अध्यक्षपदी निवड

सांगलीच्या भूमिपुत्राची भरारी

तासगाव, गुरुवार दि. 31 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेड या छोट्याश्या गावातील दास ऑफशोअरचे व्यवस्थापकीय संचालक उद्योगपती डॉ.अशोक खाडे यांची आयआयटी भागलपुरच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. आयआयटी भागलपुरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पेड व सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप कायदा २०१७ अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार कार्यरत भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षपदी डॉ.अशोक खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सहाय्यक सचिव सौम्या गुप्ता यांनी याबाबतचे पत्र दिले असून ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे. सध्या जगभरात दास ऑफशोअरच्या माध्यमातून उद्योगाचे जाळे पसरविणाऱ्या अशोक खाडे यांचे मूळ गाव तासगाव तालुक्यातील पेड आहे. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीचा सामना करीत सातवीपर्यंतचे शिक्षण येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पुढील अकरावी पर्यंतचे शिक्षण तासगाव येथे वसतिगृहात राहून पूर्ण केले. आईच्या इच्छेच्या जोरावर व वडिलांनी दिलेल्या आत्मविश्वासाचा ध्यास घेऊन त्यांनी जिद्दीच्या जोरावर अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. तत्वज्ञान विषयात एमफील, डॉक्टरेट आणि डॉक्टरेट ऑफ सायन्स या पदव्या मिळविल्या. आंतराष्ट्रीय उद्योगपतीच्या घरामध्ये आजही ९७ वर्षाच्या आईची पूजा केली जाते हे या कुटुंबाचे वैशिष्ट्य! तीन भावांच्या नावांच्या इंग्रजी अध्यक्षराने “दास” हे ऑफशोअरचे नाव बनले आहे. थोरले बंधू दत्ता, मधले बंधू अशोक व धाकटे बंधू विद्यमान कामगार मंत्री सुरेश खाडे. अध्यात्माचा वारसा जपणाऱ्या व आईला दैवत मानणाऱ्या या कुटुंबाच्या उत्तुंग कार्याने पेडची मान अभिमानाने उंचावत आहे. संपूर्ण देशात एकूण २५ आयआयटी संस्था आहेत. त्यांना ट्रिपल आयआयटी म्हणूनही ओळखले जाते. त्यापैकी पाच संस्था पूर्णपणे भारत सरकारतर्फे चालवल्या जातात. त्यापैकी एक असणाऱ्या आयआयटी भागलपूरच्या अध्यक्षपदी अशोक खाडे यांची निवड झाली आहे.