कोल्हापूर, दि. ९ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) छत्रपती राजाराम कारखान्याच्या कारभारावर टीका करणाऱ्या सर्जेराव मानेंनी आपले रंग निवडणुकीच्या तोंडावर का बदलले याचा खुलासा आधी करावा अशी मागणी राजाराम चे माजी अध्यक्ष शिवाजी रामा पाटील यांनी केली. राजाराम कारखाना कार्यक्षेत्रातील चांदे, कोते, लाडवाडी, केळोशी, कुंभारवाडी, जाधववाडी, कुरणेवाडी, अवचितवाडी या गावांच्या प्रचार दौऱ्यावेळी ते बोलत होते. आम्ही काटकसरीने कारभार करून शेतकरी सभासदांची आणि कामगारांची देणी थकवली नाहीत ही वस्तुस्थिती विरोधकांना माहित नाही का? असा प्रश्नही त्यांनी केला. सभासदांवर वरवंटा फिरवून बडेजाव मिरवण्याची आमची प्रवृत्ती नाही असा टोलाही शिवाजी रामा पाटील यांनी लगावला. तुमच्या दारात मत मागायला आल्यानंतर विरोधकांना राजाराम कारखान्याच्या ते करत असलेल्या बदनामीचा जाब विचारा असा सल्लाही त्यांनी सभासदांना दिला. सर्जेराव माने याच कारखान्यामुळे तुम्ही चेअरमन झालात, ज्या पायरी वरून मोठे झालात त्या पायरीला नावे ठेवण्याचे पाप करू नका. असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. यावेळी बोलताना माजी आमदार अमल महाडिक यांनी कारखाना प्रशासनाने सभासद शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. पूर बाधित क्षेत्रातील ऊसाला प्राधान्याने तोड देणारा राजाराम कारखाना हा जिल्ह्यातील एकमेव कारखाना असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. शेतकऱ्यांना चांगला दर देता यावा यासाठी दिवाळी पाडव्याला को जनरेशन आणि डिस्टिलरी उभारण्याचा संकल्प केल्याचं अमल महाडिक यांनी सांगितलं. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता सद्सदविवेक बुद्धीने मतदान करा असे आवाहन अमल महाडिक यांनी केले. यावेळी जयसिंग खामकर, के. पी. चरापले, सदाशिव कोरे, विश्वास बिडकर, मारुती पाटील, अशोक पाटील, बापू भिसे,बाळासाहेब खाडे,सुनील सुतार, संतोष सुतार,भगवान लाड,बाबुराव लाड, केरबा लहू पाटील,मारुती तामकर, यशवंत कुरणे, जालिंदर कोरे, भिकाजी जाधव, एकनाथ जाधव, पांडुरंग कुंभार,ज्योती कुंभार, दीपक पाटील, गणपती पाटील यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
