उदगिरी पठार – पर्यटकांसाठी पर्वणी

गुरुवार दि.14 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार, चांदोली) सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये नैसर्गिक सौंदर्यांने संपन्न असलेल्या शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर वारुण ते उदगीरी या मार्गावर विविध जातीच्या रंगीबेरंगी वेली फुलांनी बहरलेले पठार पर्यटकांना सध्या खुणावत आहे. या पठारावर सध्या सितेची आसवे, निलीमा, लाल गालीचा, जांभळी मंजीरी, पांढरी शुभ्र गेंद, दिप गालीचा व निळयाशार आभाळी फुलांचा जणु साजच चढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हे पठार पर्यटकासाठी मिनी कास पठारच ठरत आहे. शिराळा तालुक्यातील आरळा येथुन शाहुवाडी तालुक्यातील शित्तुर वारुण राघुवाडा ते उदगीरी या मार्गावर अगदी रस्त्यालगत हे पठार आहे. आरळा ते उदगीरी पठार असा अंदाजे दहा किलोमीटर अंतराचा नागमोडी वळणाच्या रस्त्यावरुन प्रवास करताना हिरव्यागर्द वनराईने नटलेला परीसर मोहवुन टाकतो पठारावर प्रवेश करताच थंडगार आंगाला झोंबणारा गार वारा सडयावरील पातळ दगडावरील उमलेली सितेची आसवे, निलीमा तसेच विविध रंगाची फुललेली फुले पर्यटकांना एक पर्वणीच ठरत आहे. तर दुपारनंतर पठारावर पसरलेली दाट धुक्यांची झालर पर्यटकांना मोहित करून टाकत आहे. याच मार्गावरुन सध्या मलकापूर डेपोने मलकापूर उदगीरी एसटी बससेवा सुरु केल्याने पर्यटकांना या मिनीकास पठाराचा आनंद लुटता येणार आहे.