लोकसहभागातून शाळेला संगणक, भौतिक सुविधासाठी निधी भेट
तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता आणि भौतिक परिस्थिती सुधारावी. माझी शाळा आदर्श शाळा या उद्दिष्टाने सांगली जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून मॉडेल स्कूल ही संकल्पना राबवली जात आहे. या उपक्रमाअंतर्गत तासगाव तालुक्यातील उपळावी येथील जिल्हा शाळेची मॉडेल स्कूल साठी निवड करण्यात आली.
तालुक्यातील एकूण दहा शाळांची मॉडेल स्कूलसाठी निवड करण्यात आली. उपळावी जिल्हा परिषद शाळा , ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून मॉडेल स्कूल टप्पा क्र. २ च्या अनुषंगाने गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड , सरपंच आशाराणी कदम, सांगली जिल्हा बँकेचे संचालक बी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपळावी येथे बैठक पार पडली .
यावेळी मॉडेल स्कूलच्या माध्यमातून आदर्श शाळा बनवण्यासाठी लोकवर्गणीतून भौतिक सुविधा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले. आणि अवघ्या तासाभरातच अडीच लाखाची लोक वर्गणी कार्यक्रमावेळी जमा झाली. तर तर शाळेसाठी 15 संगणकांची लोकसहभागातून तरतूद करण्यात आली. मॉडेल स्कूलच्या माध्यमातून भौतिक सुविधा पेव्हिंग ब्लॉक, किचन गार्डन, परसबाग, वृक्षलागवड, स्वागत कमान, बाला रंगकाम, क्रिडा साहित्य, ग्रंथालय पुस्तके व फर्निचर अशी कामे लोकसभागातून केली जाणार आहेत.
शासनाबरोबरच शाळांचा विकास घडवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार गरजेचा आहेच. शैक्षणिक गुणवत्ता व भौगोलिक दृष्ट्या ग्रामीण भागातील शाळा भक्कम झाल्या पाहिजेत. असे सांगून उपळवीकरांच्या दानशूरपणा बाबत गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांनी कौतुक केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड, बी एस पाटील, चंद्रकांत कदम, कनिष्ठ अभियंता सुनील चव्हाण, कनिष्ठ अभियंता पी. ए. माने, प्रभारी उप अभियंता जावेद शेख , बी. आर. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी उपसरपंच पोपट शिंदे, भारत वाघमारे, सी.एस.पाटील, मणेराजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख विष्णु शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष विनायक शिंदे, ग्रामसेविका नदाफ तसेच ग्रामस्थ पालक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत-प्रस्ताविक वरिष्ठ मुख्याध्यापक मीराबाई सुतार यांनी केले तर आभार संजय पाटील यांनी मानले.
तालुक्यातील 10 शाळांची निवड… “माझी शाळा- आदर्श शाळा “या अंतर्गत
मॉडेल स्कूल टप्पा क्र. २ साठी तासगाव तालुक्यातील हातनूर, आरवडे, मोराळे पेड, दहिवडी, सावर्डे, नागांव (नि), कवठेएकंद नं.२, अंजनी, उपळावी, ढवळी या जिल्हा परिषदेच्या शाळांची निवड करण्यात आली आहे. याचा लाभ त्या भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
