करजगी पीडीतेच्या पालकांचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे कडून सांत्वन

आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही

जत, मंगळवार दिनांक – 11 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जत तालुक्यातील करजगी येथे ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, ही घटना अतिशय वेदनादायी आहे. पोलिसांनी तातडीने दोषारोपपत्र तयार करून न्यायालयामार्फत नराधमास जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली. या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची माजी खासदार संजय काका पाटील यांनी मंगळवारी भेट घेतली. यावेळी पीडीतेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना या प्रकरणात लागेल ती मदत करणे ही माझी जबाबदारी असल्याचे संजय काका यांनी स्पष्ट केले. यावेळी माध्यमांशी बोलताना माजी खासदार संजय काका पाटील म्हणाले, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा प्रकारच्या घटना परत करण्याचे धाडस होऊ नये, म्हणून संबंधित आरोपीला कडक शासन होणे गरजेचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपीला कडक शासन व्हावे, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.