कवठेएकंद, दि. ९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील जिल्हा परिषद शाळा नं. 1, जि.प. शाळा नं. २, न्यू इंग्लिश स्कूल, स्काय बर्ड प्री स्कूल, गांधले पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे सभागृहात माता पालकांच्या उपस्थितीत विविध मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद शाळा नं. 2 येथे महिला दिनानिमित्त वाढीव शाळा खोल्यांच्या बांधकामाचा शुभारंभ शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच राजेंद्र शिरोटे, उपसरपंच जयश्री पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष दिव्या शिरतोडे, मुख्याध्यापिका सुजाता भोसले, माजी पंचायत समिती सदस्य संतोष आठवले, विनोद लगारे, ग्रामविकास अधिकारी विजय मस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिला जनजागृती याबाबत केंद्रप्रमुख वंदना कदम यांनी मार्गदर्शन केले. स्काय बर्ड फ्री स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम, महिलांचे मनोरंजक खेळ, व घरगुती वस्तूंचे प्रदर्शन असे उपक्रम घेण्यात आले. याचे संयोजन मिनाज व्हनवाड केल. गांधले पब्लिक स्कूलच्या वतीने सिद्धराज देवालय येथे महिलांच्या पाककला कृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सहभागी महिलांना व विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली.

