तासगाव पंचायत समिती शिक्षण विभागाचा उपक्रम
तासगाव, दि.26 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने कवठेएकंद येथे केंद्रातील 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. केंद्राअंतर्गत येणाऱ्या शिरगाव कवठे, नागाव कवठे, कवठेएकंद, कुमठे, धुळगाव, येथील 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच 4 थी व 7 वी पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि 8 वी सारथी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 287 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविलेल्या जि. प.शाळा नं.2 कवठेएकंदची विद्यार्थिनी कार्तिकी साळुंखे व अन्वी पाटील (गुण 246) यांचा व मार्गदर्शक शिक्षिका भक्तीप्रिया कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड, विस्तार अधिकारी प्रदीप चव्हाण, सांगली मनपाच्या प्रशासन अधिकारी सौ गीता शेंडगे, माजी केंद्रप्रमुख बी. डी.भोरे, केंद्रप्रमुख सौ वंदना कदम आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रातील 30 गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख वंदना कदम, विस्तार अधिकारी गीता शेंडगे यांचेकडून गुणवंत विद्यार्थ्यांना वही व पेन चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमावेळी मुख्याध्यापिका सुजाता भोसले, रुक्मिणी वाघमोडे, जयश्री पाटील, विजया पवार, मुख्याध्यापक नेताजी कांबळे, राजेंद्र सगरे, श्रीरंग जाधव यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत विशाल खाडे यांनी तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख वंदना कदम यांनी केले. सूत्रसंचलन सुनिता गोरवे-देशमुख यांनी केले. अभिजीत लंगडे यांनी आभार मानले .
