कवठेएकंद च्या क्षारपड जमीन प्रश्नी शेतकऱ्यांशी साधला संवाद
कवठेएकंद, दि.8 जुलै 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शेतीला पाणी गरजेचे आहे. अति होऊनही चालणार नाही. जमिनीचे आरोग्य बिघडते. त्यासाठी अतिरिक्त होणारे पाणी बाहेर काढले पाहिजे. शासन आणि शेतकरी यांनी समन्वयाने क्षारपड निर्मूलनाचा प्रश्न सामूहिक प्रयत्नाने निकाली काढावा. शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी.असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी कवठे एकंद येथे बोलताना व्यक्त केले. कवठेएकंद ता. तासगाव येथील सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था यांच्या वतीने आयोजित क्षारपड व पाणथळ जमीन सुधारणा मोहिमेबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आ. सुमनताई पाटील, डॉ. नरेंद्र खाडे, रोहित पाटील, पाटबंधारे संशोधन विभाग पुणे च्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर , संजय बजाज आदी उपस्थित होते. शरद पवार पुढे म्हणाले की ”नदीकाठसह इथल्या जमिनी काळ्या कमी धर असणाऱ्या आहेत. अति पाण्यामुळे त्यांची सुपीकता बिघडली आहे. शेतकऱ्यांनी जमिनीची सुपीकता आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालताना काळजीने शेती केली पाहिजे. ऊस शेती ही आळशी लोकांची शेती आहे. एकदा ऊस लावला की साखर कारखान्याला पाठवायची वाट बघायची. बाकीचा सगळा वेळ दुनियाभरच्या राजकारणाच्या चर्चा करत बसायचं. हे योग्य नाही तर प्रपंच नेटाने केला पाहिजे. असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला. कवठे एकंद येथील क्षारपड जमीन निर्मूलनासाठी शासकीय योजनेतून लाभ द्यावा अशा मागणीचे निवेदन सिद्धराज पाणीपुरवठा संस्था सर्व शेतकरी सभासद यांच्या मा. शरद पवार व आमदार सुमंत पाटील यांना वतीने देण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रिया लांझेकर बोलताना म्हणाल्या की काळया जमिनींना पुरेसा निचरा नसल्यामुळे आणि शेतीला जास्त पाणी वापरल्यामुळे जमीन पातळ होऊन खराब होते. यामुळे पाण्याचा काटकसरीने व ठिबक सिंचन सारख्या पद्धतीने वापर केला पाहिजे. पाणी देणे हे जबाबदारी जलसंपदा विभागाची आहेच मात्र पाण्यामुळे क्षारपट व नापीक झालेल्या जमीन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. क्षारपड सुधारण्यासाठी ८०% शासन निधी तर 10% संबंधित शेतकरी तसेच 10% परिसरातील साखर कारखाना उद्योग असे प्रयोजन शासनाचे आहे. या योजनेचा लाभ घेऊन खराब होणारी जमीन क्षारपड मुक्त करण्यासाठी सहभाग दर्शवावा. असे त्यांनी सांगितले. यावेळी युवक नेते रोहित पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र थोरात संचालक प्रा. बाबुराव लगारे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर, आरफळ चे आशुतोष धर्मे, समीर घबाडे, तानाजी मदने, शिराज मुजावर, अशोक घाईल, सर्जेराव पाटील,अनिल पाटील, दीपक घोरपडे बाळासो शिरोटे, प्रकाश देसाई, सुनील लंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक प्रवीण वठारे, प्रास्ताविक रामचंद्र थोरात, आभार सूर्यकांत पाटील यांनी मानले.

