प्रा. अजितकुमार कोष्टींचा हसवणूक कार्यक्रम, तासगाव महोत्सवास उदंड प्रतिसाद

तासगाव, दि.३१ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा-विनायक कदम)
शाळा ते लग्न, हनिमून ते संसारापर्यंत गण्याच्या उचापती ऐकून तासगावकर हास्यकारंजात चिंब भिजून निघाले. हास्यसम्राट फेम अजितकुमार कोष्टी यांनी तासगाव येथील साने गुरुजी नाट्यगृहात हास्याचा महापूर आणला. त्यांनी एकापेक्षा एक सरस हास्यविनोद करत प्रा अजितकुमार यांनी उभारलेल्या गण्याच्या काल्पनिक पात्राला तासगावकरांनी डोक्यावर घेतले. साधं भोळं वाटनाऱ्या गण्याच्या बालपणापासून ते त्याचे लग्न, संसार असे सगळ्या टप्प्यावरील विनोदांनी धमाल उडवून दिली. मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी तासगाव महोत्सवाच्या अंतर्गत हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी या कार्यक्रमातून बदलत्या सामाजिक परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत उपस्थितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम केले. लॉकडाऊनमधील गण्याची ऑनलाईन शाळा, गण्याकडे फोन नाही तर मास्तरांकडे रेंज नाही इथून ते गण्याला पोरगी बघण्यापासून हनिमूनपर्यंतचा प्रवासाने धमाल उडवली. प्रा.कोष्टी यांनी गण्याच्या माध्यमातून माणसाचा कंजुषपणा, बायकोचा संशयी स्वभाव, नवर्याचा इरसालपणा, कोरोना काळातील गमतीजमती, ट्रकच्या मागील बाजूस लिहिलेली खुमासदार सुभाषिते, एस.टी. स्टँडवरील चमत्कारिक उद्घोषणा, प्रासंगिक विनोद, दैनंदिन जीवनात स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांच्या भूमिका केल्यास घडणारे संभाव्य विनोद, लहानग्यांच्या निरागस वागण्यातून घडणारे नकळत विनोदाचे साभिनय कथन करीत सुमारे दोन तास श्रोत्यांना खळखळून हसवले.
यावेळी बोलताना ते म्हणाले कोरोना काळात कळलेला माणूस, त्यांचं वागण, समाजातल्या विविध क्षेत्रांतील लोकांचे अनुभव यातील बारकावे हास्याच्या माध्यमातून मांडत प्रेक्षकांना अंतर्मुख करण्यास भाग पाडले. विनोदाला विषय नसतो असे त्यांनी सांगितले. तासगाव महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून त्याचे उत्तम नियोजन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केले.