मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या तासगावात आंदोलन
तासगाव, बुधवार दि. 7 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वर पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी 7 सप्टेंबर रोजी तासगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत अशी माहिती सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. उद्या गुरुवारी सकाळी नऊ वाजता शहरातील जिजाऊ चौक वरचे गल्ली येथून मोर्चा सुरुवात होणार आहे. स्टेशन रोड मार्गे शहरातील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बस स्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. हे सर्व आंदोलन लोकशाही मार्गाने आणि शांततापूर्वक होणार आहे. संपूर्ण दिवसभर तासगाव शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. तालुक्यातील काही गावात यापूर्वीचा बंद पाळण्यात आलेला असल्याने त्या गावांची इच्छा असेल तर त्यांनी उद्याच्या आंदोलनात सहभाग व्हावे, असे आव्हान करण्यात आले आहे. उद्याच्या आंदोलनात बस व्यवस्था बंद असल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तालुक्यातील शाळा कॉलेज व महाविद्यालय यांना सुट्टी द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. जोपर्यंत संपूर्ण मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्रपणे चालू ठेवण्याचा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी ऍड. कृष्णा पाटील, अमोल शिंदे, अजय पाटील, अविनाश पाटील, महादेव पाटील, लालासो पाटील, सुनील जाधव, बाबुराव जाधव, पांडुरंग जाधव, सचिन पाटील, सचिन चव्हाण, ज्योतीराम जाधव, अभिजित पवार, बाळासो सावंत, अमोल कदम, प्रदीप थोरबोले, खंडू कदम, सुदर्शन पवार, दीपक पाटील, अभिजित पाटील यांच्या सह सर्व मराठा समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.
