चिंचोलीच्या मैदानात पै.सिकंदर शेख ने पै.प्रितपाल फगवाडा ला केले चितपट

हजारो कुस्ती शौकीनांचे डोळ्याचे पारणे फिटले

शिराळा, दि.21 फेब्रुवारी 2023 (नथुराम कुंभार, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) चिंचोली ता.शिराळा येथील आत्मलिंग देवाच्या याञेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात नंबर एकची कुस्ती मध्ये महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेखने पैलवान प्रितपाल फगवाडा यास एकचाक डावावर चितपट करुन हजारो कुस्तीशौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. ही कुस्ती भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी.आर.आण्णा जाधव यांनी पुरस्कृत केली होती. दुसर्‍या क्रमांकासाठी उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड (आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे) विरूद्ध पै.भाऊ फगवाडा यांच्यात झालेल्या लढतीत महेंद्र गायकवाड हप्ते हा डावावर विजयी झाला. तिसर्‍या क्रमांकासाठी महाराष्ट्र चॅम्पियन पै.समीर देसाई (रुस्तम – ए – हिंद कुस्ती संकुल पुणे) विरुद्ध पै.विजय धुमाळ (शिवनेरी तालीम अकलुज) या कुस्तीत समीर देसाई ने आकडी डावावर विजय मिळवला. चौथ्या क्रमांकासाठी पै.संदीप मोटे (भोसले व्यायामशाळा सांगली) विरुध्द पै.अरुण बोंगार्डे (मोतीबाग तालीम कोल्हापुर) यांच्यात झालेल्या कुस्तीत संदिप मोटे एकलंगी डावावर विजयी झाला. दरम्यान यावेळी मैदानात पै.विजय मांडवे पै.दत्ता बाणकर यांनीही प्रेक्षणीय कुस्त्या केल्या तसेच ओंकार जाधव, शुभम पाटील, प्रणव जाधव, सुरज पाटील, शंभुराज पाटील, किरण जाधव, प्रणव पाटील, धिरज जाधव, सचिन‌ महागावकर, ओंकार लवटे, राजवर्धन पाटील, अभिजीत बानकर, तुषार जाधव, साहील पाटील आदिंनी मल्लांनी चटकदार कुस्त्या केल्या. या कुस्ती मैदानाचे समालोचन पै.ईश्वरा पाटील सर यांनी केले तसेच हलगीवादन मारुती मोरे यांनी हालगीवादनाने मैदानात रंगत भरली.