जिद्द आणि चिकाटी असेल तर यश निश्चित मिळते – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे

चार्टड अकॉउंट परीक्षेत यश मिळवलेल्या निखिल वाघमोडे यांचा सत्कार संपन्न

तासगाव, दि.17 जुलै 2023 (महाराष्ट्र महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) ज्ञानाची विज्ञानाशी सांगड घालून सुसंस्कारी विद्यार्थी घडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने यश संपादन करावे असे गौरव उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे ‘ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी निखिल वाघमोडे यांच्या सत्कार निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले. चार्टर्ड अकौंटंट अर्थात सी.ए. परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन केले त्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. प्राचार्य पुढे म्हणाले महाविद्यालयाला गुणवत्तेची मोठी परंपरा असून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात काहीतरी करण्याचा ध्यास घ्यावा नियमित अभ्यास करून यश संपादन करण्याचा प्रयत्न करावा आणि आई-वडिलांसह महाविद्यालयाचा लौकिक वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी निखिल वाघमोडे यांनी ‘माझ्या जडणघडणीत महाविद्यालयाचे योगदान’ विद्यार्थ्यांना सांगितले. संयम, कष्ट करण्याची तयारी आणि परिस्थितीची जाणीव ठेवली तर आपण निश्चितच ध्येयापर्यंत पोहोचू शकतो असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्युनिअर विभागप्रमुख प्रा. एस.डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.डी.एन.यादव – पाटील यांनी केले. तर आभार प्रा.एस.व्ही.माळी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.ए.एन. पाटील यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.