जैन मुनीच्या हत्येच्या निषेधार्थ कवठेएकंदला मुकमोर्चा

मूक मोर्चा, व्यापार बंद ठेवून श्रद्धांजली, दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी – तहसीलदारांना निवेदन

कवठेएकंद, दि.20 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जैन मुनी प. पू. १०८ आचार्यश्री कामकुमारनंदी यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा कवठे एकंद व नागाव कवठे येथील समस्त जैन समाज बांधवाकडून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. तर घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गावातून मूक मोर्चा काढण्यात आला. कवठे एकंद येथील जुनी चावडी पासून एसटी स्टँड पर्यंत जैन समाज बांधवांनी मूकमोर्चा काढण्यात आला. गावातील व्यापारी वर्गाकडून व्यवहार बंद ठेवून मूक मोर्चाला पाठिंबा दिला. तर एसटी स्टँड येथे सदर घटनेचा निषेध करून मुनि प. पू. १०८ आचार्यश्री कामकुमारनंदी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अजितनाथ , शांतिनाथ, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर तसेच चंद्रप्रभू जीन मंदिर नागाव कवठे येथील जैन समाज बांधव ग्रामस्थ, व्यापारी सहभागी झाले होते. चातुर्मासाच्या पवित्र पर्वाच्या सुरुवातीलाच कर्नाटक येथील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदापर्वत आश्रममधील प.पू.१०८आचार्यश्री कामकुमारनंदी यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत क्रूर दुःखद आहे. जैन समाजामध्ये या घटनेचा तीव्र संताप असून या अत्यंत निंदनीय घटनेचा समस्त जैन समाजच्यावतीने कवठे एकंद व नागाव कवठे येथे निषेध व्यक्त करण्यात आला. हत्येमधील दोषी आरोपींवर लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून त्यांना अत्यंत कठोर शिक्षा व्हावी. अशी मागणी जैन समाजाच्यावतीने करण्यात आली. जैन साधू-साध्वींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून अशा घटना भविष्यात पुन्हा होवू नयेत. याकरीता शासनाने जैन साधू-साध्वींच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी कायदेशीर ठोस उपाय योजना कराव्यात. अशा मागणीचे निवेदन तासगाव तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्याकडे जैन समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले.