ज्ञानाचा खजिना वाढविण्यासाठी पुस्तकांचा आश्रय घ्या – प्रा.आण्णासाहेब बागल

पी.डी.व्ही.पी. महाविद्यालयात जागतिक वसुंधरा दिन व पुस्तक दिन साजरा

तासगाव, दि.27 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. ज्ञानाचा खजिना वाढविण्यासाठी पुस्तकांचा आश्रय घ्या असे उद्गार केंद्र संयोजक प्रा.आण्णासाहेब बागल यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक वसुंधरा दिन व पुस्तक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले ग्रंथ हेच आपले गुरु आहेत .वाचनाने माणूस शहाणा होतो.म्हणून नियमित वाचनाची सवय आपण ठेवावी. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून काही पुस्तके आपण घ्यावीत व वाचावीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वाचनाचा गुण आपल्या अंगी रुजवावा.झाडांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आणि मनुष्याच्या प्रगतीसाठी चांगल्या पुस्तकांची गरज असते असेही त्यांनी सांगितले.पर्यावरणाचे संतुलन राखून वसुंधरेचं रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पुष्पलता पुजारी यांनी केले तर आभार प्रा.हणमंत काळे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमिला सावंत यांनी केले कार्यक्रमाला प्रा.रोहिणी बागल, जगदिश सावंत यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.