डी.वाय. कारखान्यातून लुटलेले अडीचशे कोटी रुपये गेले कुठे ? – अमल महाडिक

कोल्हापूर,दि.7 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) डी. वाय. पाटील कारखान्याने को-जनरेशन आणि उपपदार्थ विक्रीतून गेल्या बारा वर्षात मिळवलेले जवळपास अडीचशे कोटी रुपये गेले कुठे? असा थेट सवाल माजी आमदार अमल महाडिक यांनी राजाराम कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी राधानगरी तालुक्यात झालेल्या विविध बैठकात केला. अमल महाडिक म्हणाले, उत्पन्नाचा कोणताही इतर मार्ग नसताना राजाराम कारखान्याने सभासदांना डी वायच्या बरोबरीने दर दिला आहे. किंबहुना काही वेळा अधिक दर दिला आहे. को-जनरेशन आणि इतर उपपदार्थ निर्मिती यंत्रणा असूनही डीवाय ने तुलनेने कमीच दर दिला आहे. गेल्या बारा वर्षांचा विचार केला तर जवळपास अडीचशे कोटी रुपये को जनरेशन आणि उपपदार्थ विक्री मधून डीवायला जास्तीचे मिळाले असतील, पण हे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या झोळीत न जाता कुणाच्या खिशात गेले? याचे उत्तर विरोधकांनी द्यावे असे आव्हान अमल महाडिक यांनी दिले.राजाराम कारखान्याचा कारभार पारदर्शक असून केवळ संभ्रम पसरवण्यासाठी विरोधकांची बॅनरबाजी चालली आहे. पण अशा पोस्टर बॉईजना सुज्ञ सभासद थारा देणार नाहीत असा टोलाही महाडिक यांनी लगावला. यावेळी बोलताना कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सर्जेराव माने यांच्यावर जोरदार टीका केली. ज्यांनी दोन वेळा अध्यक्ष पद भोगले त्यांना निवडणुकीच्या तोंडावरच हुकूमशाहीची जाणीव कशी झाली असा सवाल शिवाजी पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी दत्तात्रय निले, राजाराम मोरे, गोविंदा चौगुले, पवन महाडिक, विजय महाडिक, मारुती चौगले, चंद्रकांत पाटील, प्रकाश डेळेकर, शामराव चौगले, महादेव चौगले, आनंद निल्ले, महेश निल्ले, शरद लिंग्रज विजय ढेरे, मारुती पाटील यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.