डॉ प्रतिभा पैलवान यांना संत तुकाराम महाराज समाजरत्न पुरस्कार जाहीर.

इचलकरंजी, सोमवार दि.7 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व मराठी साहित्य संस्कृती कला विकास परिषद आयोजित सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन 2023 हे इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावी 20 ऑगस्ट 2023 रविवार रोजी आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात यावर्षीचा संत तुकाराम महाराज समाजरत्न पुरस्कार 2023 कवियत्री प्रा.डॉ प्रतिभा पैलवान, इचलकरंजी यांना जाहीर करण्यात आला आहे. अंथुर्णे, बारामती येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, असे साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री.जगदिप वनशिव यांनी सांगितले. यावेळी साहित्य, नाट्य चित्रपट कला, पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. एक दिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटक आमदार दत्ता मामा भरणे (माजी पालकमंत्री सोलापूर), प्रमुख पाहुणे मेघराज राजे भोसले (अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), ज्येष्ठ कविवर्य, वसंतराव पाटील (जलदगती हायकोर्ट माझगाव न्यायाधीश), श्रीमंत आकळे साहेब (सहाय्यक पोलीस आयुक्त परिवहन विभाग,पुणे), सिने अभिनेता बाबा गायकवाड, प्रा.डॉ.संदीप सांगळे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष) हे उपस्थित राहणार आहेत. डॉ.पैलवान या राजहंस फौंडेशनच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या संवेदनशील आयुष्यावर प्रकाश टाकण्यासाठी त्या काम करत आहेत. आजपर्यंत अनेक गोर-गरीब, गरजू, अनाथ, वंचित आणि तृतीयपंथीयांच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड समितीकडून डॉ प्रतिभा पैलवान यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.