तासगाव, दि.28 जानेवारी 2023 (महाराष्ट्र मराठी वृत्तसेवा)
तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील भारतीय सैन्य दलातील जवान गणपती शंकर भोसले यांचे यकृताच्या दीर्घ आजाराने शनिवारी पुणे येथे सैन्य दलाच्या रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ४० वर्षाचे होते. सैन्य दलातील आसाम येथील तेजपूर येथील 1812 पायनियर युनिट मध्ये ते सेवेत होते.
गेल्या काही दिवसापासून त्यांना यकृताच त्रास सुरु झाल्याने पुणे येथील सैन्य दलाच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज शनिवारी 28 जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गणपती भोसले यांचे पार्थिव रविवारी डोंगरसोनी येथे आणण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. डोंगरसोनी गावावर शोककळा पसरली आहे.
