तब्बल 21 वर्षांनी जुळून आला विद्यार्थांचा मेळा…..

आटपाडी येथील भवानी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी पुण्याच्या पंचतारांकित हॉटेल मध्ये भरवला स्नेह मेळावा.

जुन्या आठवणीत रमले मित्र – मैत्रिणी, सर्वांनी केली धमाल, रंगला खेळ, गप्पा – गोष्टी, अन केली मौज – मजा आणि मस्ती.

बुधवार दि.12 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा…. असे म्हंटले जाते. कारण प्रत्येक माणसाला आपल्या बालपणीच्या आठवणी बद्दल विलक्षण आकर्षण असते. बालपणीच्या या जुन्या आठवणी आपल्या आयुष्याच्या नव्या वाटेवर सातत्याने नवी ऊर्जा देत असतात. असाच ऊर्जा देणारा उपक्रम राबवला तो 2000 – 2002 च्या 10 वी – 12 वी च्या विज्ञान शाखेच्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी. तब्बल 21 वर्षांनी एकत्रित येऊन जुन्या आठवणीत रमले हे सारे सवंगडी. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील औंध शिक्षण संस्थेच्या भवानी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा पुणे येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये नुकताच स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. दोन ओंडक्याची होई सागरात भेट….. एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही भेट…! म्हणजे आयुष्याच्या वाटेवर लहानपणी शालेय जीवनात हवेहवेसे वाटणारे मित्र किंवा मैत्रीण पुढे जाऊन आयुष्यात पुन्हा भेटतील याची खात्री नसते. कॉलेज, नोकरी, व्यवसाय, बिजनेस, विवाह, संसार, कौटुंबिक जबाबदारी या सर्वच गोष्टीत जरी आपण गुंतत गेलो तरी शाळेतील ते दिवस आणि आठवणी आपल्याला नवी ऊर्जा देत असतात. त्या जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. आज विविध क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करून आपल्या मातृभूमीला नावलौकिक मिळवून दिलेल्या भूमी पुत्रांचा सन्मान यावेळी करण्यात आला. औसा येथील न्यायाधीश सुभाष फुले, मिरज गाव येथील ऍग्री क्लचर कॉलेजचे प्राचार्य रामदास बिटे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सातारा चे उपप्राचार्य जयकुमार चव्हाण, आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, ‘परिक्रमा माणदेशची’ या कादंबरीचे लेखक दिलीप मोटे, प्रथम वर्ग अधिकारी सावित्री वाक्षे, तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, डॉ. किरण लाळे, डॉ. अजित पाटील, डॉ. अमृता जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी प्रकाश गावंदरे, उद्योजक प्रसाद जवळे, उदयोजक संकेत पाटील, यांच्या सह अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा ठरला. यावेळी 80 हुन अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. तर अमेरिका येथील सिलिकोन व्हॅली येथे इंजिनियरिंग क्षेत्रात काम करणाऱ्या प्रियदर्शनी जोशी यांनी कार्यक्रमात व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला. निवेदिका स्वाती बालटे यांनी उत्तम निवेदन व सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. त्यांना दत्तात्रय नागणे यांनी साथ दिली. सुरवातीला प्रत्येकानी आपली व्यक्तिगत माहिती सांगितली आणि शालेय जीवनातील जुन्या घटना, गंमतीदार किस्से सांगून आठवणीना उजाळा दिला. दिवसभर गाणी, खेळ, मनसोक्त डान्स, गप्पा गोष्टी आणि भोजन यांचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. स्नेह मेळावा पार पाडण्यासाठी प्रकाश गावंदरे, संकेत पाटील, अमोल लिगाडे, प्रसाद जवळे, डॉ. अमृता जाधव, सचिन गायकवाड, समीर जाधव, ऍड केदार भिंगे, वसीम कलाल यांच्या सह इतर मित्र आणि मैत्रिणींनी परिश्रम घेतले.