तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित आर आर आबा पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करीत अर्ज भरला
तासगाव, दि. 24 ऑक्टॉबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात मोठ्या प्रमाणात दडपशाही व धमक्या असे प्रकार चालतात. मात्र, धमक्यांना न घाबरता दडपशाहीला या मतदारसंघातून हद्दपार करा असे सांगत रोहित पाटील लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्याचे सांगत ‘घड्याळ’वाल्याच डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले. तासगाव कवठेमंकाळ विधानसभेचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी तासगाव येथे आले होते. यावेळी आ. सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, ताजुद्दिन तांबोळी, अनिता सगरे,अमित पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, या मतदार संघाचे पालकत्व शरद पवार साहेबांनी घेतलेले आहे. आपण आबांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपले पद वापरले. ते गृहमंत्री असताना त्यांनी केलेले काम व सध्याचे गृहमंत्री हे धृतराष्ट्र असून गुजरातची पट्टी त्यांच्या डोळ्यावर आहे. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात काकांना वाटते की रोहित पाटील हा बच्चा आहे मात्र त्यांचा अभ्यास कमी असून तो आबांचा छावा आहे एक लाख मताने तो निवडून येणार असून त्याला कमी समजू नका असे आवाहन त्यांनी घेतले केले. तासगावची आजची गर्दी बघून छोटा नाही तर मोठाच उभा राहणार आहे. मात्र त्यांची डाळ शिजणार नाही. त्यांनी घड्याळ हातात घातले तरी त्याचे सेल कधीच काढून टाकलेत. संधी द्या म्हणून ते आमच्याकडेही आलते. ते स्वतःला पैलवान समजतात पण बाजार समितीच्या मारामारी वेळी महिला व मुलांच्यावर ते दगड मारत होते. असे सांगत माझ्या मतदार संघाचे विजयाचे रेकॉर्ड मोडा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले की, आयुष्याचे नवी सुरुवात करताना तुमच्यामुळे आबांची कमी कधी जाणवली नाही. सुमनताई यांच्या नेतृत्वावर अनेकांनी शंका व्यक्त केल्या मात्र मर्दाला लाजवेल असं काम तिने करून दाखवले. मतदारसंघात आमच्या उपोषणामुळे टेंभू योजनेला आठ टीएमसी अतिरिक्त पाणी मिळाले. नोकऱ्यांचा प्रश्न मी लवकरच संपवतोय, मनेराजुरीच्या माळावर एमआयडीसीत दहा हजार मुलांच्या हाताला काम मी देणार आहे. असे सांगत एमआयडीसीचे श्रेय घेणाऱ्यांनी एमआयडीसी होऊ नये यासाठी अनेक अडथळे आणल्याचे सांगितले. यावेळी बोलताना माजी खासदार संजय काका पाटील यांचे नाव न घेता ते म्हणाले की, ते स्वतः काही करत नाहीत मात्र दुसऱ्यांनी आणलं की मी केलं असं म्हणतात. लोकं पाणी द्या म्हणून माझ्याकडे येत नाहीत म्हणून अनेकांच पाणी त्यांनी अडवल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारसंघात 850 कोटी मी आणले असे सांगत इथली गुंडगिरी हद्दपार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे एक इंच ही जमीन अनाधिकृत कोणाच्या नावावर होऊ देणार नाही व त्रास देणाऱ्यांनाही सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला. आमच्या कामाचा हिशोब मागणाऱ्यांनी पंधरा वर्षातले तुम्ही तुमची कामे सांगा मी माझे सांगतो असे सांगत एका व्यासपीठावर येण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणी कितीही एकत्र आले तरी फरक पडत नाही असे सांगत जनता माझ्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
