तासगावात शनिवारी नाभिक समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा

संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजन, खा.संजय काका पाटील, आ.सुमनताई पाटील यांची उपस्थिती

तासगाव, बुधवार दि.7 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव येथील नाभिक समाजाच्या संत सेना महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने शनिवारी 9 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय वधू – वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील संत सेना सेवा संघ व परिचय कलेक्शन-परिचय ज्वेलर्सच्या सहकार्याने संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने शनिवार दि. 9 सप्टेंबर ते सोमवार दि.11 सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 9 रोजी तासगाव येथील समृद्धी हॉलमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय मोफत नाभिक वधू – वर मेळाव्यास खासदार संजयकाका पाटील व आ. सुमनताई पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती उद्योजक सुरेश माने (शेठ) यांनी दिली. तहसीलदार रवींद्र रांजणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे, तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्राचे सपोनि शैलेश शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाळके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शनिवारी दुपारी 2 ते 5 या वेळेत स्काय वे अकॅडमीच्या संगीता काळे यांचे सेमिनार होणार आहे. तसेच शनिवारी व रविवारी सकाळी 11 ते 4 या वेळेत सिनर्जी हॉस्पिटल, सांगली यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. रविवार दि.10 रोजी 10 ते 2 या वेळेत क्लासिक अकॅडमी, इचलकरंजीच्या नीता गायकवाड यांचे नाभिक व्यावसायिकांसाठी सेमिनार तर याच दिवशी दुपारी 2 ते 5 या वेळेत ‘दि बिझनेस बूस्टर’ मुस्तकीन साखरकर यांचे उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. सोमवार दि.11 रोजी संत सेना महाराज मंदिरात पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त श्री ची पूजा अर्चा, भजन, फुले वाहण्याचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 9 वाजता सुप्रियाताई खंडागळे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या या कार्यक्रमास नाभिक समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुरेश माने व संत सेना सेवा संघाचे अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी केले आहे. यावेळी बाळासाहेब जाधव, प्रवीण जाधव, विजय साळुंखे, प्रभाकर गायकवाड, सुमित माने, दत्तात्रय सपकाळ, संकेत माने आदी उपस्थित होते.