प्रदीप माने यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणी साठी सर्व पक्ष एकवटले
तासगाव, बुधवार दि.23 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शासकीय कार्यालयात होणारी सामान्य नागरिकांची लूट आणि अडवणूक बंद व्हावी या मागणी साठी आक्रमक झालेल्या प्रदीप माने यांच्या वर खोटे गुन्हे दाखल झालेच्या निषेधार्थ तासगावात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या अन्यथा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला. तहसीलदार रविंद्र रांजणे यांना मोर्च्याच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष व सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने यांच्या समर्थनात तासगाव शहरातून मोर्चा काढण्यात आला.भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून सामान्य जनतेच्या होणाऱ्या लुटीच्या विरोधात आवाज उठवला म्हणून खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सर्व पक्षीय तासगाव तालुका बंद ची हाक दिली होती. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तासगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. बुधवारी 23 ऑगस्ट रोजी सर्व पक्षीय रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थकासह तासगाव तहसीलदार कार्यालयावरती आंदोलन व मोर्चा काढण्यात आला यावेळी सर्वपक्षीय संघटना एकत्रित येऊन मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी जो खोटा गुन्हा दाखल केला आहे तो मागे घ्यावा अशी मागणी केली. यावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
